(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी तिसंग बौद्धवाडी ते धरण मार्गावर असलेला अरुंद यू-टर्न वाहनचालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. रत्नागिरीकडून येणाऱ्या एस.टी. बस तसेच जयगडमार्गे कळझोंडीकडे जाणाऱ्या वाहनांना या वळणावर गाडी फिरवताना अक्षरशः ‘तारेवरची कसरत’ करावी लागते.
धरण मार्गावर असलेले हे वळण इतके अरुंद आहे की, मोठ्या वाहनांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याचा धोका सतत निर्माण होतो. विशेषतः एस.टी. बसचालकांना येथे वाहन फिरवताना मोठी कसरत करावी लागत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या रस्त्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, रत्नागिरी विभागाच्या अखत्यारित करण्यात आले असले तरी यू-टर्नचा आकार अत्यंत लहान राहिल्याने सर्वच वाहनचालक त्रस्त आहेत. स्थानिक ग्रामस्थ, प्रवासी, पर्यटक व वाहतूकदारांनी या धोकादायक वळणाचा आकार वाढवण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी संबंधित विभागाकडे केली आहे.

