(संगमेश्वर / दिनेश अंब्रे)
संगमेश्वर तालुक्यातील नावडी भंडारवाडा येथे राहणारे सुप्रसिद्ध गणेश मूर्तिकार प्रशांत उर्फ सन्ना सुर्वे यांच्या चित्रशाळेत सध्या गणेशमूर्ती निर्मितीची लगबग सुरू आहे. सन्ना सुर्वे यांचे गणपती कलेचे शिक्षण रत्नागिरीतील श्री. नंदकुमार भाटकर (भाटे) यांच्या मार्गदर्शनाखाली १५ वर्षे झाले. त्यानंतर २००७ साली त्यांनी संगमेश्वर येथील भंडारवाडा येथे राहत्या घरी गणेश चित्रशाळेची स्थापना केली. आई कै. सौ. जयमाला जगन्नाथ सुर्वे आणि वडील कै. श्री. जगन्नाथ मुकुंद सुर्वे यांच्या पाठबळामुळे त्यांना योग्य दिशेने पुढे जाण्याचा मार्ग मिळाला.
सुरुवातीला केवळ दोन गणपतीची चित्रे काढून शाडूमाती व रंगकलेला प्रारंभ केला. मेहनत, जिद्द, आवड व चिकाटी यांच्या जोरावर तसेच पत्नी सौ. प्राप्ती यांच्या सहकार्यामुळे पुढे चित्रशाळेत गणेशमूर्तींच्या ऑर्डर्स येऊ लागल्या. ग्राहकांच्या आवडीनुसार, कॅलेंडरवरील किंवा छायाचित्रांप्रमाणे रेखीव मूर्ती साकारण्यास त्यांनी सुरुवात केली.
सध्या त्यांच्या कार्यशाळेत कलाधिपती, कैलासपती, राजेशाही, लालबागचा राजा, स्वामी समर्थ, शिवपिंडीवर बेल वाहणारा, हत्तीच्या सोंडेभोवती मिठी मारणारा अशा अनेक आगळ्यावेगळ्या, आकर्षक व देखण्या मूर्तींची निर्मिती सुरू आहे. दोन ते चार फूट उंचीच्या या मूर्ती शाडूमातीपासून पूर्णपणे हस्तकौशल्याने साकारल्या जात आहेत.
चित्रशाळेला यंदा १७ वर्षे पूर्ण झाली असून, यावर्षी गणेशोत्सव लवकर आल्यामुळे सध्या मातीच्या कामाची लगबग अधिकच वाढली आहे.

