(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागाने वैद्यकीय इतिहासात अभिमानाची नोंद करून ठेवावी अशी कामगिरी नुकतीच यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. चिपळूण येथील सुभाष विष्णू चव्हाण (58) यांच्यावर जायंट हर्निया या अतिदुर्मिळ आणि अत्यंत कठीण अवस्थेवरील शस्त्रक्रिया अवघ्या एका तासात पार पाडण्यात डॉक्टरांना यश आले. तब्बल २० किलोपर्यंत वाढलेल्या अंडाकोषातून रुग्णाला मुक्तता मिळवून देत रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाने वैद्यकीय सेवा आणि कौशल्याचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
गेल्या पाच वर्षांपासून रुग्णाच्या अंडाकोषाचा आकार सतत वाढत असून, लघवी व विसर्जनाच्या क्रियेत प्रचंड त्रास निर्माण झाला होता. 25 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोनोग्राफी चाचणीत अंडाकोषात थेट मोठे आतडे व मूत्राशय सरकल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. जांघेपासून अंडाकोषापर्यंत पसरलेल्या ‘जायंट हर्निया’चे निदान झाले. रुग्णाला नियंत्रणात नसलेला उच्च रक्तदाब असल्याने शस्त्रक्रियेला जीवघेणा धोका असल्याचे भूलतज्ज्ञांनी स्पष्ट केले. मोठे आतडे व मूत्राशय पोटात परत ढकलण्यासाठी आवश्यक जागा नसल्याने, 31 ऑक्टोबर आणि 3 नोव्हेंबर रोजी ‘प्न्यूमोपरिटोनियम’ प्रक्रिया करून CO₂ गॅस भरून पोटातील जागा वाढवण्याचा अभिनव उपाय डॉक्टरांनी अवलंबला. ही तयारी नसल्यानंतर इतकी जटिल शस्त्रक्रिया करणे अशक्य होते. परंतु रत्नागिरीच्या शस्त्रक्रिया विभागाने ही जोखीम कुशलतेने स्वीकारली.
7 नोव्हेंबर 2025 रोजी शस्त्रक्रिया विभागातील डॉ. जिज्ञासा भाटे (विभाग प्रमुख) व डॉ. मनोहर कदम (सहाय्यक प्राध्यापक) यांच्या नेतृत्वाखाली इंग्विनल मेशोप्लास्टी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. अतिदुर्मिळ श्रेणीतील या हर्नियाचे उपचार अतिशय छोट्या चिरांमधून, अवघ्या एका तासाच्या कार्यक्षमता व अचूकतेने पूर्ण करून विभागाने कौशल्याची कसोटी उत्तीर्ण केली. ऑपरेशननंतर काही दिवसांतच रुग्ण पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून, लघवी विसर्जनातील त्रास पूर्णत: नाहीसा झाला. अत्यंत मोठा झालेला अंडाकोष आता पुन्हा सामान्य स्थितीत आला आहे.
या शस्त्रक्रियेच्या यशामागे डॉ. मनोहर कदम यांची प्रतिभा, मेहनत आणि अविचल जिद्द उभी आहे. उच्च दर्जाचे तांत्रिक कौशल्य, विस्तृत अनुभव आणि नेमक्या निदान क्षमतेमुळे डॉ. कदम अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांमध्ये अत्यंत प्रवीण मानले जातात. त्यांनी आजपर्यंत अनेक जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. त्यांचा शस्त्रक्रिया अनुभव व्यापक असून, अपेंडिसायटीस शस्त्रक्रिया, हायड्रोसील दुरुस्ती, पित्ताशयातील खड्यांवरील (Gallbladder stones) शस्त्रक्रिया, शरीरावरील सूज, गाठी, गाठरोगांचे उपचार, जायंट व कॉम्प्लेक्स हर्नियाची शस्त्रक्रिया, कॉर्न, डायबेटिक फूट, गॅंग्रीनवरील शस्त्रक्रिया व जखम व्यवस्थापन ,पाइल्स, फिशर व फिस्टुलावरील प्रगत उपचार, थायरॉईड व इतर मान–घशातील गाठींच्या शस्त्रक्रिया, लॅप्रोस्कोपिक (छिद्रविद्या) शस्त्रक्रिया, एंडोस्कोपिक प्रक्रिया व विविध निदान–उपचार पद्धती ते उच्च कार्यक्षमतेने करतात. या सर्व शस्त्रक्रियांमध्ये त्यांची गती, दक्षता, टीमवर्क आणि निर्णयक्षमता विशेष उठून दिसत असते.
या शस्त्रक्रियेत अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर, तसेच भूलतज्ज्ञ डॉ. जमशेर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. अवघड परिस्थितीतही धैर्याने, नेमकेपणाने आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या जाणिवेने केलेली ही शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालय, रत्नागिरीच्या वैद्यकीय क्षमतेचा भक्कम पुरावा आहे. ही कामगिरी केवळ एका रुग्णाचे जीवन वाचवणारी नाही, तर जिल्हास्तरीय वैद्यकीय सुविधांना राज्यात नवे स्थान देणारी ठरली आहे.

