(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कोकण रेल्वेमधून धावणाऱ्या १२०५२ जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये दिनाक १ जुलै रोजी पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा बळी प्रवाशांना ठरावे लागले. वरून पडणाऱ्या पावसाचे सर्व पाणी थेट डब्यांत शिरल्याने प्रवाशांची अक्षरशः धांदल उडाली. सीटवर बसता येत नव्हते, तर खालीही ओलसरपणा आणि चिखलमुळे बसणे अशक्य झाले होते. अशा स्थितीत रत्नागिरीतून मुंबईत जाण्यासाठी ८ ते १० तासांचा प्रवास म्हणजे नरकयातना बनल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
पावसाळा सुरू झाला की कोकण रेल्वेच्या प्रवासात अडथळे, गळक्या गाड्या, उशिर आणि अस्वच्छता याचेच साम्राज्य असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. रात्रीच्या प्रवासात झोपणे तर दूरच, पण नीट बसणेही दुरापास्त झाले आहे. गेल्या अनेक अनेक दिवसांपासून कोकण रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना वारंवार अशाच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यातील हा त्रास नेहमीचा झाल्याचे चित्र असून, रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. यातून राज्यकर्त्यांना कधी मिळणार कोकणवासीयांना सुटकेचा श्वास? असा थेट सवाल विचारला जात आहे.
प्रवाशांचा संताप
हे केवळ आजचे नाही, तर दर पावसाळ्यातील सातत्याने घडणारे वास्तव आहे. यावर रेल्वे मंत्रालय आणि कोकण रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून डबे बदलणे, गळती थांबवणे आणि प्रवाशांना मुलभूत सुविधा पुरवणे आवश्यक आहे. “प्रवाशांनी तिकीटाचे पैसे भरून त्रास सहन करायचा का?” “रेल्वे मंत्री, कोकण रेल्वे प्रशासन झोपले आहेत का?” अशा प्रतिक्रिया संतप्त प्रवाशांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

