(मुंबई)
यंदा शिक्षण विभागाने राज्यातील काही निवडक शहरांमध्ये सुरू असलेली इयत्ता अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यभर लागू केली. या प्रक्रियेचा मुख्य उद्देश सर्व विद्यार्थ्यांना पारदर्शक आणि समान संधी उपलब्ध करून देण्याचा होता, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
शिक्षण विभागाने 1 ऑगस्टपासून इयत्ता अकरावीचे वर्ग सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याने आता हे वर्ग 11 ऑगस्टपासून सुरू करण्याचे निर्देश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी जाहीर प्रकटनाद्वारे दिले आहेत. दहावीचा निकाल लागल्यानंतर जवळपास चार महिन्यांनी अकरावीचे वर्ग सुरू होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये याबाबत उत्सुकता दिसून येत आहे.
‘ओपन टू ऑल’ फेरी अंतर्गत प्रवेश
सध्या इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी ‘ओपन टू ऑल’ फेरी अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या टप्प्यात 3,81,420 विद्यार्थ्यांपैकी 3,48,784 विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांनी 8 ऑगस्टपर्यंत संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले होते. राज्यातील सुमारे 9,525 कॉलेजांमधील एकूण 21,50,130 जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रक्रियेसाठी 14,55,945 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी 8,82,081 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. नियमित परीक्षेसह पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘ओपन टू ऑल’ फेरी आयोजित करण्यात आली आहे.
2 लाखांहून अधिक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित?
‘ओपन टू ऑल’ फेरीत 3,48,784 विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले असून आतापर्यंत 8,82,081 विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. म्हणजेच सध्या एकूण 12,30,865 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. मात्र एकूण नोंदणीकृत विद्यार्थ्यांची संख्या 14,55,945 असल्यामुळे सुमारे 2 लाखांहून अधिक विद्यार्थी अद्यापही प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या संधी मिळाव्यात यासाठी तातडीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातून होत आहे.

