( दापोली )
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत केळशी येथे कार्यरत असलेल्या रावेच्या इंद्रधनू व वसुधा गटाच्या विद्यार्थिनींनी यांत्रिक शेतीचे महत्त्व आणि विद्यापीठ तंत्रज्ञान प्रचार आणि प्रसार या विषयांवर एक व्यापक असे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. सदर मार्गदर्शन शिबिर 6 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 4 वाजता केळशी येथे पार पाडण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शन डॉ. सचिन पाठक व डॉ. प्रविण झगडे हे होते.
डॉ. सचिन पाठक यांनी विविध शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रणांची माहिती दिली. शेतकऱ्यांना नव नवीन यंत्र प्रत्यक्षात दाखवण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने पंकज पडलर, 7-रो ट्रान्सप्लॅटर, 8-रो ट्रान्स प्लॅटर, नूतन मँगो हार्वेस्टर, अमर लॉरेनथस कटर, काजू कटर, सुपारी काढणे यंत्र, इत्यादी यांचा समावेश होता.
डॉ. प्रविण झगडे यांनी कृषी विद्यापीठाबद्दल माहिती सांगितली. तसेच कृषी शिक्षणाबद्दल शेतकऱ्यांना महत्त्व पटवून दिले. शेतकऱ्यांना विविध योजनांबद्दल माहिती सांगितली. त्यांनी कृषी व्यवसाय कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले.
यांत्रिक शेतीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता करणे व विद्यापीठ तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे या हेतूने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रोजेक्टरच्या सहाय्याने डॉ. प्रविण झगडे व डॉ. सचिन पाठक यांनी शेतकऱ्यांना माहितीचे सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या शेवटी शेतकऱ्यांना पडलेल्या विविध प्रश्नाचे निरसन करण्यात आले. या कार्यक्रमामुळे शेतकर्यांना यांत्रिक शेतीचे महत्त्व व गरज समजली. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात डॉ. झगडे यांचे मोलाचे योगदान ठरले.

