(गणपतीपुळे / वैभव पवार)
कळझोंडी धरण परिसरात गेल्या वर्षी नव्याने बांधण्यात आलेल्या जॅकवेलमध्ये सध्या ठिकठिकाणी गळती होऊ लागल्याने धरण व्यवस्थापन आणि बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे, या जॅकवेलमध्ये नैसर्गिक झरे ठेवण्यात आलेले नाहीत, जे आधीच्या जॅकवेलमध्ये होते. परिणामी, धरणातील पाणी थेट या जॅकवेलमध्ये सोडावे लागत आहे.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या नव्या जॅकवेलचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून, त्यामुळेच गळतीचा त्रास निर्माण झाला आहे. या संदर्भात सखोल चौकशी करणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
संबंधित प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने स्थानिकांमध्ये संतापाची भावना आहे. गळती थांबवण्यासाठी त्वरित उपाययोजना आवश्यक असतानाही उदासीनता पाहायला मिळत आहे.
याशिवाय, पंप सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांना जॅकवेलच्या रॅम्पवरून जावे लागते. मात्र, सध्या तिथे फक्त एक कमकुवत आणि धोकादायक शिडी ठेवण्यात आलेली आहे. या शिडीच्या तुटण्याचा धोका असून, यातून मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मजबूत रॅम्प तातडीने उभारण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.
त्याचबरोबर, जॅकवेलच्या विहिरीत अस्वच्छ पाणी असून त्यामध्ये दगड, फलक, प्लायवूडचे तुकडे आणि रिपा यांचा खच साचलेला आहे. हे सर्व साफ करून पाण्याची गुणवत्ता आणि प्रवाह सुधारणे अत्यावश्यक आहे.
सध्या या जॅकवेलमध्ये 150 एच.पी. क्षमतेचे आधुनिक पंप बसवण्यात आले आहेत. या पंपांच्या माध्यमातून जलदगतीने आणि मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होऊ शकतो. पूर्वी 75 एच.पी. क्षमतेचे जुने पंप वापरण्यात येत होते, जे सध्या जीर्ण अवस्थेत असून त्यांची सातत्याने दुरुस्ती करावी लागत आहे.
धरण परिसरात उत्तम यंत्रणा असूनही कर्मचाऱ्यांना जुन्या यंत्रणेवर अवलंबून राहावे लागत असल्याने नवीन यंत्रणा केवळ नावापुरतीच असल्याचा सवाल उपस्थित होत आहे.
या पार्श्वभूमीवर, धरण प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन जॅकवेलमधील गळती थांबवावी, मजबूत रॅम्प उभारावा आणि आधुनिक पंप प्रणाली कार्यान्वित करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

