(राजापूर / वार्ताहर)
जैतापूर खाडी पुलावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना होणारा त्रास आणि अपघातांचा वाढता धोका याबाबत स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून सतत दुर्लक्षित होत असतानाच, पत्रकार राजन लाड आणि काही जागरूक नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे पुढाकार घेऊन या खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी केली.
सध्या सुरू असलेल्या जेटीच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या मिक्सरमध्ये उरलेले काँक्रीट खड्डे बुजवण्यासाठी वापरता येईल का, याची चौकशी पत्रकार लाड यांनी केली. संबंधित कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शिल्लक मटेरियल उपलब्ध करून देताच कामाची सुरुवातही झाली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत पुलावरील मोठे खड्डे बुजविले. तसेच वाहतुकीला अडथळा होऊ नये आणि टाकलेले सिमेंट गाड्यांच्या टायरला लागून निघून जाऊ नये म्हणून संध्याकाळी चारपासून सातपर्यंत तब्बल तीन तास एका बाजूला मोटरसायकल ठेवून आणि दुसऱ्या बाजूला स्वतः उभे राहून यासाठी खबरदारी घेतली.
या उपक्रमात समीर शिरवडकर, उदय गिरकर आणि ग्रामपंचायत सदस्य दिवाकर आडवीरकर गुरुजी यांनीही सक्रिय सहभाग घेतला. एस.टी. चालकांसह अनेक वाहनचालकांनी या प्रयत्नाचे मनापासून स्वागत केले व समाधान व्यक्त केले.
पत्रकार राजन लाड म्हणाले, “सतत तक्रार करत बसण्यापेक्षा आपणही थोडीशी कृती करून पाहावी या उद्देशाने हा प्रयत्न केला. हा उपक्रम केवळ खड्डे बुजवण्यापुरता मर्यादित नाही, तर समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठीचे एक पाऊल आहे. आपणच आपल्या सुरक्षिततेसाठी खारीचा वाटा उचलू शकतो. जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे आल्यास अशी अनेक कामे आपण करू शकतो, व धोके टाळू शकतो”
संबंधित विभागाने या खड्ड्यांकडे कायमस्वरुपी उपाययोजना करण्याकडे तातडीने लक्ष द्यावे, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही या बाबींमध्ये पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.