(जैतापूर / वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली गयाळ कोकरी येथील रूपेंद्र विलास कोठारकर यांनी तक्रार केली आहे. त्यांनी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तीन व तीन पेक्षा जास्त अपत्य असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात माहिती अधिकारात माहिती मागविली होती. माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार ज्या अंगणवाडी सेविकांना तीन किंवा तीन पेक्षा जास्त अपत्य आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
रूपेंद्र कोठारकर यांच्या म्हणण्यानुसार शासन परिपत्रक एस आर व्ही २००० प्र.क्र. १७/२०००/ बारा दिनांक २८ मार्च 2005 पर्यंत नुसार आपल्या कार्यालयाकडे लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक आहे, तशा सुचना मंत्रालयीन विभागाकडून सर्व कार्यालयीन प्रमुखांना पाठवण्यात आल्या आहेत. या अधिसूचनेनुसार या कार्यालयात कार्यरत असणारे अनेक कर्मचारी आहेत असे आपल्याला संबंधित कार्यालयाकडून माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीतून निष्पन्न होत आहे. त्यामुळे जे कर्मचारी (अंगणवाडी सेविका) व इतर ज्यांना ३ अपत्य असून अजूनही नोकरीवर कार्यरत आहेत त्यांना योग्य ती चौकशी करून तात्काळ अनर्हित करण्यात यावे व त्याचा अहवाल मला पाठवण्यात यावा असे लेखी कळविण्यात येऊन सुद्धा अद्याप पर्यंत कोणतीच कारवाई होत नसल्याने त्यांनी थेट मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे तक्रारदार यांचे म्हणणे असून संबंधित व्यक्तींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.