( मुंबई )
पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बल (RPF) ने चर्चगेट ते सुरतदरम्यान चालणाऱ्या लोकल, मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवासी, फेरीवाले, भिकारी आणि तृतीयपंथीयांवर कारवाई करण्यासाठी मागील १२ दिवसांपासून विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान एकूण १६३२ जणांविरोधात रेल्वे कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं आहे.
आरपीएफचे आयजी अजय सादानी आणि वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त संतोष कुमार सिंह राठोड यांच्या आदेशावरून ही मोहीम राबवण्यात आली. ‘रेल मदत’ आणि ट्विटरवर प्रवाशांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींमुळे रेल्वे प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली. या विशेष तपासणीसाठी साध्या पोशाखातील अधिकाऱ्यांची खास पथकं तयार करण्यात आली होती.
या मोहिमेत २९८ अनधिकृत फेरीवाले, १०० तृतीयपंथी जे प्रवाशांना त्रास देत होते, तसेच ८८९ सामान्य प्रवासी जे विकलांग कोचमध्ये अनधिकृतपणे प्रवास करत होते, आणि ८० पुरुष जे महिला डब्यात बेकायदेशीरपणे प्रवास करत होते, अशा सर्वांवर कारवाई झाली. यांच्यावर रेल्वे कायद्यानुसार गुन्हे दाखल करून न्यायालयात हजर करण्यात आलं. याशिवाय सायाजीनगरी एक्सप्रेसमध्ये स्लीपर कोचमध्ये अनधिकृतपणे जनरल तिकीटावर प्रवास करणाऱ्या २४४ प्रवाशांकडून ₹१,३२,८५५ चा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई केवळ प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नव्हे, तर रेल्वेच्या शिस्तबद्धतेसाठी देखील महत्त्वाची असल्याचं RPF अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
RPF पश्चिम रेल्वे मार्गावर सक्रिय असून आतापर्यंत प्रवाशांच्या मालमत्तेची चोरी करणाऱ्या ३२८ गुन्हेगारांना पकडून पुढील कारवाईसाठी जीआरपीकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. दारू तस्करीच्या ५६३ प्रकरणांमध्ये, अंदाजे ₹२०.०९ लाख किमतीची दारू जप्त करत आरोपींना अटक करण्यात आली. तसेच घरातून पळून गेलेली किंवा हरवलेली १९१ मुले शोधून त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडे किंवा संबंधित NGO कडे सुपूर्द करण्यात आलं आहे.
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की, अनधिकृत प्रवास, फेरीवाला गोंधळ, महिला डब्यांतील बेकायदेशीर वावर आणि विकलांग कोचचा गैरवापर या बाबतीत भविष्यातही अशीच कठोर कारवाई केली जाईल. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी RPF सातत्याने कार्यरत राहील, असं आश्वासनही अधिकाऱ्यांनी दिलं आहे.