(मुंबई)
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET 2025) चा निकाल जाहीर झाला असून, महाराष्ट्रातील १,२५,७२७ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यंदा देशभरातून अव्वल १० गुणवंतांच्या यादीत महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कृष्णांग जोशी याने देशात तिसरा क्रमांक, तर आरव अग्रवाल याने दहावा क्रमांक पटकावला आहे.
या परीक्षेसाठी महाराष्ट्रातून २,४८,२०१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, यापैकी २,४२,८५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १.२५ लाखांहून अधिक विद्यार्थी पात्र ठरले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत १७,१०२ नी घट झाली आहे. (२०२४ मध्ये पात्र विद्यार्थ्यांची संख्या १,४२,८२९ होती.)
सर्वोच्च गुण प्राप्त करणाऱ्या २० मुलींमध्ये महाराष्ट्राच्या सिद्धी बढे हिने तिसरा (AIR 26), उर्जा शहा हिने पाचवा (AIR 31), आणि इश्मित कौर हिने बारावा क्रमांक (AIR 85) पटकावला.
मुलांच्या यादीत कृष्णांग जोशी (AIR 3), आरव अग्रवाल (AIR 10) आणि उमेद खान (AIR 21) हे विद्यार्थी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहेत.
देशभरातून १२.३६ लाख विद्यार्थी पात्र
देशभरातून यंदा १२,३६,५३१ विद्यार्थी NEET पात्रतेसाठी पात्र ठरले आहेत. ही परीक्षा ४ मे २०२५ रोजी, देशातील व विदेशातील एकूण ५,४६८ परीक्षा केंद्रांवर पार पडली होती.
निकाल १४ जून रोजी जाहीर करण्यात आला असून, परीक्षार्थी https://neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहू शकतात.
NEET परीक्षा यंदाही हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराथी, बंगाली, कन्नड, मल्याळम, तमिळ, तेलगू, उर्दू इ. १३ भाषांमध्ये घेण्यात आली होती. परदेशात अबूधाबी, दुबई, दोहा, सिंगापूर, रियाध अशा प्रमुख ठिकाणीही परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती.