( नवी दिल्ली )
देशभरात खळबळ उडवणाऱ्या महादेव ऑनलाइन बेटिंग घोटाळ्याच्या मुख्य आरोपींपैकी एक रवी उप्पल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. डिसेंबर २०२३ मध्ये दुबईत अटक झाल्यानंतर त्याचे भारतात प्रत्यार्पण होणार होते, मात्र प्रक्रिया अपूर्ण राहिल्याने ४५ दिवसांनंतर त्याची सुटका करण्यात आली. आता रवी उप्पल दुबईतून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्रत्यार्पणासाठी आवश्यक कागदपत्रांचा विलंब
महादेव ऑनलाइन बेटिंग घोटाळ्याची चौकशी करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ED) इंटरपोलमार्फत रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्यानंतर उप्पलला दुबईत अटक करण्यात आली होती. मात्र, यूएई प्रशासनाने मागितलेली काही कागदपत्रे वेळेत प्राप्त न झाल्याने प्रत्यार्पण प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. ईडीने सर्व आवश्यक दस्तऐवज वेळेत सादर केल्याचा दावा केला असला तरी, प्रशासकीय विलंबामुळे उप्पलची सुटका झाली. त्यानंतरही त्याच्यावर देखरेख ठेवण्यात आली होती, पण आता तो देखरेखीखालून निसटून अज्ञात ठिकाणी गेल्याचे समोर आले आहे.
वानुआतूचा पासपोर्ट, ललित मोदीशी साधर्म्य
रवी उप्पलकडे दक्षिण प्रशांत महासागरातील बेट राष्ट्र वानुआतूचे नागरिकत्व आणि पासपोर्ट असल्याचे उघड झाले आहे. वानुआतूचा पासपोर्ट ललित मोदींकडेही होता; मात्र प्रत्यार्पण टाळण्याच्या कारणावरून त्या देशाने मोदींचा पासपोर्ट नंतर रद्द केला होता. वानुआतू सरकारने स्पष्ट केले होते की, “गुन्हेगारी कारवाईपासून बचाव करणे हे नागरिकत्वाचे वैध कारण ठरत नाही.” भारतीय तसेच यूएई अधिकाऱ्यांकडे सध्या रवी उप्पलचा ठावठिकाणा उपलब्ध नाही. स्थानिक वृत्तांनुसार, उप्पल दुबई सोडून अज्ञात ठिकाणी गेला आहे. त्याच्यासोबतचा सहकारी सौरभ चंद्राकर अद्याप दुबई प्रशासनाच्या ताब्यात असल्याचे सांगितले जाते.
वानुआतूमध्ये मालमत्ता व नेटवर्क विस्तार
ऑस्ट्रेलियापासून सुमारे २,००० किलोमीटर अंतरावर असलेले पोर्ट विला हे वानुआतूचे राजधानी शहर आहे. रवी उप्पल आणि सौरभ चंद्राकर यांनी या बेट राष्ट्रात नागरिकत्व मिळवून मालमत्ता खरेदी केल्या आणि त्यांच्या गुन्हेगारी नेटवर्कचा विस्तार केला असल्याचा आरोप आहे.
२०१८ मध्ये स्थापन झालेल्या महादेव अॅपद्वारे दररोज तब्बल २०० कोटी रुपयांचा बेकायदेशीर नफा मिळत असल्याची ईडीकडून नोंद आहे.

