(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली ते बावननदी या दरम्यान सुरू असलेल्या ढिसाळ कामकाजामुळे त्रस्त झालेल्या जनतेने यापूर्वी 26 जुलै रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता. कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून संगमेश्वर पोलीस ठाण्यात समन्वय बैठक बोलावण्यात आली होती.
बैठकीदरम्यान आंदोलनकर्त्यांनी प्राधिकरण अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. अपघातांमुळे झालेल्या जखमा, काहींचा गेलेला जीव, आणि दैनंदिन जीवघेणा प्रवास याबाबत लोकांनी संताप व्यक्त केला. मात्र, ठेकेदार कंपनीचा एकही जबाबदार अधिकारी हजर न राहिल्याने उपस्थितांचा संताप अधिकच भडकला. उलट, प्राधिकरण अधिकारी ठेकेदारांची बाजू घेत असल्याने त्यांनी ठेकेदाराची पाठराखण करण्याचा ठेकाच घेतला आहे का? असा संशय लोकांमध्ये निर्माण झाला.
०१ ऑगस्ट रोजी आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ आणि प्राधिकरण अधिकारी यांच्यासोबत महामार्गाची पाहणी करण्याचे ठरले होते; मात्र वेळकाढूपणा करत तो दौरा वारंवार पुढे ढकलण्यात आला. अखेरीस ०४ ऑगस्टला काहींना घेऊन पाहणी झाली, पण त्यावेळीही ठेकेदार कंपनीचा एकही जबाबदार अधिकारी हजर राहिला नाही.
या सर्व घडामोडींमुळे जनतेचा संताप शिगेला पोहोचला. आंदोलकांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितले की, हा निव्वळ वेळकाढूपणा असून जनतेच्या जीवाशी खेळ केला जात आहे. त्यामुळे आता माघार घेणार नाही, आंदोलन आणि उपोषण करूनच न्याय मिळवू असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. तर राहुल गुरव यांनी जाहीर केले की, “झाले तेवढे बास! आश्वासनांच्या भूलथापा नकोत. आता उपोषण आणि आंदोलनाशिवाय पर्याय नाही.”
त्याअनुसार 11 ऑगस्ट रोजी सोनवी पुलाशेजारी राहुल गुरव उपोषणास बसणार असून, संगमेश्वर तालुक्यातील जनता महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे. याबाबत निवेदन प्रशासन विभागाला सादर करण्यात आले आहे.