(संगमेश्वर)
संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात मडगाव एक्सप्रेस, जामनगर एक्सप्रेस आणि पोरबंदर एक्सप्रेस या तीन नवीन गाड्यांच्या थांब्यांसाठी गेले वर्षभर पाठपुरावा करत “निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर फेसबुक ग्रुप” ने आपल्या मागणीवर लवकर निर्णय होऊन कोकण रेल्वे प्रशासन वर्षाचा शेवट संगमेश्वरकरांना गोड बातमी देऊन करेल अशी अपेक्षा व्यक्त केली होती. परंतु वर्ष सरायला काहीच दिवस शिल्लक राहिले असले तरी अजुन याबाबत कोकण रेल्वे प्रशासनाकडून काही हालचाल होताना दिसत नाही.
थांब्यासंदर्भात रेल्वेने ३१ डिसेंबर पर्यंत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशा आशयाचे पत्र या संघटनेने रेल्वेला दिले असून तसे न झाल्यास उपोषणासारख्या आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल असा इशारा दिला होता. त्यानुसार वर्षाच्या शेवटपर्यंत यावर निर्णय न झाल्यास नवीन वर्षाची सुरूवात अंदोलनाने करावी लागणार असल्याचे संघटनेचे प्रमुख श्री. संदेश जिमन यांनी म्हटले आहे.