(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर येथील कसबा परिसरातील संभाजी महाराज स्मारक स्थळी रविवारी काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट देत स्मारक उभारणीबाबत सरकारवर तीव्र टीका केली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृती जतन करण्यासाठी भव्य स्मारक उभारण्याची मागणी त्यांनी पुन्हा ठामपणे मांडली.
सपकाळ म्हणाले की, संगमेश्वर येथील वाडा परिसरात स्मारक उभारण्याबाबत सरकारकडून घोषणा झाल्या आहेत; मात्र प्रत्यक्षात आजही कोणतेही ठोस काम सुरू नाही. “अरबी समुद्रातील शिवस्मारक जसे आजतागायत प्रत्यक्षात दिसत नाही, तसेच संगमेश्वर येथील संभाजी महाराज स्मारकाचाही मागमूस नाही. ही बाब वेदनादायी आहे,” असे त्यांनी सांगितले.
किल्ले संवर्धन असो वा शिव-शंभूंच्या इतिहासाचे जतन, सरकारची भूमिका केवळ घोषणांपुरतीच मर्यादित असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत त्यांनी स्पष्ट केले की, “दिलेला शब्द पाळला गेला पाहिजे. बोलणे आणि वागणे यात फरक पडत असल्याचे महाराष्ट्र पाहतो आहे.”
संभाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी सोसलेल्या यातना आणि त्यांनी बजावलेले कर्तव्य या स्थळी सदैव स्मरणात राहिले पाहिजे, असे नमूद करत सपकाळ म्हणाले की, काँग्रेस पक्ष संविधानाच्या मूल्यांवर पुढे जाण्याचा संकल्प येथे पुन्हा अधोरेखित करतो. संभाजी महाराजांच्या इतिहासाबाबत गैरसमज पसरवणाऱ्यांचा त्यांनी तीव्र निषेध केला.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, अजित पवार आणि पालकमंत्री यांनी भेट देऊन स्मारकाची घोषणा केली होती; मात्र वर्ष उलटूनही काम सुरू झालेले नाही. जागेबाबत अडचण नसताना केवळ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसतो, असे ते म्हणाले.
राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका करताना सपकाळ म्हणाले की, सामाजिक तणाव निर्माण करण्याऐवजी इतिहास संवर्धनासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. “तीनशे कोटी किंवा पाचशे कोटींच्या घोषणा केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतराव्यात. निधी अडचण नाही; इच्छाशक्तीचाच अभाव आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
“कोंबड्याने बांग दिली नाही तरी सूर्य उगवतोच; इतिहास कुणीही दडवू शकत नाही. दिलेला शब्द पाळून सरकारने धडाडी दाखवावी,” असे सांगत त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
या वेळी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, उत्तर विभागाच्या सोनलक्ष्मी घाग, संगमेश्वर तालुका अध्यक्ष काशिनाथ वाजे, माजी तालुका अध्यक्ष फैजशेठ पाटणकर, बोरसुतकर गुरुजी, चंद्रकांत कदम, दिलीप मोहिते यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

