(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी-पावस रस्त्यावर शहरालगत असलेल्या भाट्ये चौकात आज (बुधवारी, ता. ६) दुपारी एका वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींमध्ये समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये राजेश दिनकर कीर (वय ४१, रा. रनपार), मिलिंद कृष्णा महाडिक (वय ४७, रा. फणसोप), मानसी राजेंद्र पवार (वय १९) आणि तिची बहीण रुद्राक्षा राजेंद्र पवार (वय १७, दोघीही रा. भाट्ये-खोतवाडी) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश कीर (गाडी क्रमांक MH-08 AV 4050) हे मिलिंद महाडिक यांच्यासोबत दुचाकीवरून रत्नागिरीहून रनपारच्या दिशेने जात होते. त्याचवेळी मानसी पवार (गाडी क्रमांक MH-08 AZ 1824) ही आपल्या बहिणी रुद्राक्षासह भाट्ये येथून रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात सोडण्यासाठी मुख्य रस्त्यावर येत होती.
दरम्यान, भाट्ये चौकात दोन्ही दुचाकींमध्ये जोरदार धडक झाली. अपघात इतका तीव्र होता की, चौघेही रस्त्यावर फेकले गेले. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत सर्व जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
या घटनेची नोंद जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत करण्यात आली असून, अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.