(देवरुख / सुरेश सप्रे)
श्री क्षेत्र मार्लेश्वर हे कोकणातील एक जागृत देवस्थान असून, महाराष्ट्रभरातून हजारो भाविक दररोज येथे दर्शनासाठी येत असतात. मात्र, या पर्यटन व धार्मिक स्थळी आजही मोबाईल नेटवर्कचा मूलभूत प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे स्थानिक उद्योजक, ग्रामस्थ तसेच पर्यटकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या समस्येच्या समाधानासाठी मारळ ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिकांनी सरकारी दूरसंचार कंपनी BSNL कडे पाठपुरावा सुरू केला. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर अखेर टॉवर उभारणीच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. जागेची निश्चिती झाली, साहित्य आले, मनोरा उभा राहिला आणि वीज जोडणीसाठी मीटरही बसवण्यात आला. यामुळे ग्रामस्थांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला. अनेकांनी अगोदरच BSNL चे सिमकार्डही घेतले.
मात्र, आता अखेरच्या आणि महत्त्वाच्या टप्प्यात म्हणजे नेटवर्क कनेक्टिव्हिटीसाठी आवश्यक तांत्रिक साहित्य अद्यापही पोहोचलेले नाही. त्यामुळे मोबाईल टॉवर असूनही प्रत्यक्ष सेवा सुरु होऊ शकलेली नाही. ही परिस्थिती वर्षभरापासून तशीच आहे.
या समस्येच्या बाबतीत ग्रामस्थांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, स्थानिक पुढारी, खासदार, आमदार यांच्याकडे वेळोवेळी निवेदने दिली. मात्र, कुणालाही वेळ मिळालाच नाही की लक्ष देण्याची इच्छाही दिसून आली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
एकीकडे सरकार “डिजिटल इंडिया” अंतर्गत ग्रामीण भागात नेटवर्क सुविधांचा विस्तार करत असल्याचे सांगते, पण दुसरीकडे मार्लेश्वरसारख्या महत्त्वाच्या पर्यटन स्थळीही सुविधा आजतागायत मिळू शकलेली नाही. या गंभीर प्रश्नाकडे आमदार व खासदारांनी तातडीने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.