(दापोली/ रत्नागिरी प्रतिनिधी)
कोकणाच्या मातीतील सुपीक विचारांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मोठी दाद मिळाली आहे. दापोली तालुक्यातील आंजर्ले गावचा सुपुत्र पार्थ उमेश तोडणकर याने रशियातील उरल फेडरल युनिव्हर्सिटी (UrFU), एकातेरिनबर्ग येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय हॅकेथॉन स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. पार्थच्या या कामगिरीमुळे संपूर्ण कोकणासह देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सध्या पार्थ नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये बी.टेक (आयटी) च्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपली ठसा उमठवणारा पार्थ हा युवा प्रतिभेचा उत्कृष्ट नमुना ठरतो आहे. आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या वडिलांच्या प्रभावामुळे पार्थ लहान वयापासूनच संगणक, कोडिंग आणि नवतंत्रज्ञानाकडे आकर्षित झाला. शालेय जीवनात विविध विज्ञान स्पर्धांमध्ये सहभाग घेणारा पार्थ, महाविद्यालयीन शिक्षणात अधिकच झपाटला गेला.
त्याची प्रतिभा ओळखून रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने त्याची निवड रशियातील उन्हाळी इंटर्नशिपसाठी केली. याचदरम्यान, उरल फेडरल युनिव्हर्सिटीने आयोजित केलेल्या जागतिक हॅकेथॉन स्पर्धेत त्याने सहभाग घेतला आणि नाविन्यपूर्ण कल्पना व सुलभ कोडिंगच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बाजी मारली.
२२ देशांतून आलेल्या स्पर्धकांवर पार्थची मात
या हॅकेथॉन स्पर्धेत २२ देशांतील विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मर्यादित वेळेत वास्तवातील समस्यांचे नवकल्पनांद्वारे समाधान सादर करणे हे या स्पर्धेचे प्रमुख उद्दिष्ट होते. पार्थने जावा, पायथॉन, सी++, मोंगोडीबी यांसारख्या प्रोग्रामिंग भाषांवरील प्रभुत्व आणि इनोव्हेटिव्ह सोल्युशन्सच्या जोरावर सर्वांना मागे टाकले. त्याच्या या सादरीकरणामुळे त्याला ‘बेस्ट स्टुडन्ट ऑफ हॅकेथॉन’ हा सन्मान प्राप्त झाला.
कला, छंद आणि अभ्यास यांचा उत्तम समतोल
पार्थ केवळ तंत्रज्ञानातच नव्हे, तर कलाक्षेत्रातही निपुण आहे. कोडिंगसोबत तो गिटार वादन, फिशिंग आणि गायन या छंदांत रमतो. तो स्वतःच्या मानसिक संतुलनासाठी छंद जोपासण्यावर भर देतो. आधुनिक स्पर्धेच्या युगात अभ्यास, छंद आणि कुटुंब यांचा तो उत्तम समतोल राखतो.
गावाशी नाळ कायम घट्ट
पार्थचे कुटुंब आंजर्ले गावाशी अजूनही नाते घट्ट जोडून आहे. गावातील सण, उत्सव, सामाजिक उपक्रमांत त्यांचा नेहमीच सहभाग असतो. “माणूस कितीही मोठा झाला, तरी मुळांशी नाते टिकवले पाहिजे” हा विचार तो आणि त्याचे पालक उन्नती व उमेश तोडणकर दृढपणे पाळत आहेत.