( रत्नागिरी /प्रतिनिधी )
जयगडहून निवळीमार्गे बेंगळुरूकडे निघालेला गॅस टँकर सोमवारी (ता. ४) सकाळी सव्वा सहाच्या सुमारास रावणंगवाडी-तिसंग येथील वळणावर पलटी झाला. या प्रकरणी निष्काळजीपणाने वाहन चालवल्याप्रकरणी टँकर चालकावर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिश्चंद्र राजकुमार पटेल (रा. जीरकप, पो. बरदिपार, ता. मच्छीशहा, जि. जवतपूर , उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टीएन-८८-एल-९६६१ क्रमांकाचा गॅस टँकर जयगडहून बेंगळुरूकडे जात असताना निवळी परिसरातील रावणंगवाडी-तिसंग वळणावर चालकाने टँकर निष्काळजीपणे चालवल्याने अपघात घडला. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील भालचंद्र शितप यांनी तातडीने ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी हरिश्चंद्र पटेल याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली असून, टँकरमधील गॅसची गळती होऊ नये म्हणून खबरदारीचे उपाय तातडीने राबविण्यात आले होते.