(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरातील रामआळी आणि मारुतीआळी (बाजारपेठ) परिसरातील प्रस्तावित सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम थांबवण्याची मागणी स्थानिक रहिवासी व व्यापाऱ्यांनी बुधवारी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्याकडे केली आहे. रस्ता विकासाला विरोध नसतानाही, दिवाळी आणि एकादशीसारख्या महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर हे काम सुरू केल्यास नागरिकांना व व्यापाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागेल, अशी त्यांची भूमिका आहे.
रामआळी व मारुतीआळीतील व्यापारी वर्ग आणि रहिवासी यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करून आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, “सध्या सणासुदीचा हंगाम सुरू असून दिवाळी व एकादशीचा मोठा बाजार काही दिवसांवर आला आहे. या काळात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. अशा वेळी रस्ता काम सुरू केल्यास सर्वच व्यापार ठप्प होईल आणि मोठे आर्थिक नुकसान होईल.”
व्यापाऱ्यांनी पुढे सुचवले की, नवीन काँक्रीटीकरण सुरू होईपर्यंत सध्याच्या खराब रस्त्याची तात्पुरती डागडुजी (पॅचवर्क) करून नागरिकांची गैरसोय कमी करावी. तसेच रस्त्याच्या रुंदी, ड्रेनेज लाईन आणि इतर तांत्रिक बाबींवर स्थानिकांशी चर्चा करून अंतिम आराखडा तयार करावा, अशी मागणी केली.
या निवेदनासोबत नागरिकांनी रस्त्याचे प्रस्तावित स्वरूप, सूचना आणि सह्यांचे पत्रक जोडले आहे. सणांच्या काळात किंवा स्थानिक सूचनांचा विचार न करता काम सुरू केल्यास या प्रकल्पाला विरोध कायम राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या गंभीर प्रश्नावर तोडगा निघावा म्हणून नागरिकांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक घेण्याची मागणी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. या बैठकीत स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरपरिषद अधिकारी आणि व्यापारी प्रतिनिधी सहभागी यांना सहभागी करून घ्यावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

