(जाकादेवी / वार्ताहर)
मंथन वेल्फेअर फाउंडेशन यांच्यावतीने राज्यस्तरीय मंथन सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत ओरी नं.१ या केंद्र शाळेतील इ. दुसरीतील विद्यार्थी कु. शिवम संकेत देसाई याने राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत १५ वा, जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत १० वा आणि केंद्र स्तरावर गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक संपादन केला असून गुणवत्ताधारक कु.शिवम संकेत देसाई याचे शाळा व केंद्रातर्फे सत्कार करण्यात आला.
सदरची परीक्षा इक्रा इंग्लिश मिडीयम स्कूल रत्नागिरी येथे फेब्रुवारी महिन्यात मंथन वेल्फेअर फाउंडेशन यांच्यातर्फे घेण्यात आली होती. या विद्यार्थ्याला शाळेतील वर्गशिक्षक श्री. गणपती पडूळे यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. कु. शिवम देसाई याला अभ्यासाबरोबरच कॅरम खेळणे चित्र काढणे, अवांतर वाचन करणे आणि क्रीडा स्पर्धेतही अधिक आवड आहे. या परीक्षेत गुणवत्ताधारक शिवम देसाई हा विद्यार्थी उज्ज्वल यशाचा मानकरी ठरला आहे.

या परीक्षेत याच शाळेतील एकूण ८ विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संकेत उर्फ बंड्या देसाई, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष श्री. वसंत जाधव, शाळेचे मुख्याध्यापक श्री. धनंजय आंबवकर, पदवीधर शिक्षिका सौ. समिक्षा पवार, सहाय्यक शिक्षक श्री. रामदास चव्हाण, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ, पालक यांनी अभिनंदन केले आहे.