(संगमेश्वर)
रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार नारायण राणे यांनी संगमेश्वर स्थानकात तीन एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा या मागणीचे पत्र रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे दिल्लीत सादर केले होते. यासोबतच कोकण रेल्वेकडून पाठविण्यात आलेला सकारात्मक प्रस्तावही जोडला होता. त्यामुळे हे थांबे हमखास मंजूर होणार या बाबत संगमेश्वरवासीयांना खात्री होती.
याच दिवशी खासदार सुनील तटकरे यांनी अंजनी व कोलाड स्थानकांवर काही एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी रेल्वे मंत्र्यांकडे केली होती. कोकणातील जनतेसाठी हे दोन्ही विषय आनंदाचे क्षण ठरले होते. ऐन गणेशोत्सवात कोकणासाठी अतिरिक्त गाड्या आणि नवीन थांबे मिळतील, अशी आशा होती.
परंतु काही दिवसांतच अंजनी व कोलाड स्थानकांवर थांबे मंजूर झाल्याची अधिकृत पत्रं मिळाली; संगमेश्वरकर मात्र आजही प्रतिक्षेत आहेत. जवळपास महिना उलटून गेला तरीही या मागणीवर रेल्वे बोर्ड किंवा कोकण रेल्वे प्रशासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही.
या संदर्भात दोन्ही कार्यालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता रेल्वे बोर्डाने आदेश दिल्याचं सांगितलं जातं, पण कोकण रेल्वे अधिकारी असे आदेश मिळाले नसल्याचं सांगतात. अशा प्रकारे चेंडूची टोलवाटोलव सुरू असून नेमकं सत्य काय, संगमेश्वरला एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचे थांबे का नाहीत. याबाबत जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, संगमेश्वरच्या दोन-अडीच वर्षांपासूनच्या मागणीला कायम प्रतिक्षा यादीत ढकललं जातंय का? असा सवाल संदेश जिमन यांनी केला आहे
कोकणी माणूस नेहमीच गर्दीने खचाखच भरलेल्या रेल्वेने प्रवास करतो. मात्र आता संगमेश्वर तालुक्यात छत्रपती संभाजी महाराजांचे ऐतिहासिक स्थळ, गडकोट, धार्मिक ठिकाणे आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळे यांमुळे प्रवासी संख्या वाढली आहे. तरीही रेल्वे थांब्यांचा अभाव पर्यटकांसाठी त्रासदायक ठरत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त गाड्या सोडण्यात येत असल्यातरी संगमेश्वरवरवासियांच्या मागणीला हिरवा कंदील दाखवण्यात आलेला नाही त्यामुळे हा विषय खेदाचा ठरत आहे.