(देवरूख)
संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे बौद्धवाडी येथील रस्त्यावरील तिठ्यावर असलेल्या ध्वजस्तंभाची अज्ञात व्यक्तीने शुक्रवारी रात्री तोडफोड केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी देवरूख पोलीस स्थानकात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेच्या गांभीर्यामुळे पोलिस यंत्रणा तातडीने सतर्क झाली.
शनिवारी सकाळपासून फॉरेन्सिक लॅब, ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथक घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तालुका आणि जिल्हा पातळीवरील पोलीस यंत्रणा राखीव पोलीस दलासह दिवसभर घटनास्थळी तैनात होती. तपास आणि सुरक्षा उपायांसोबतच स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने तोडफोड झालेला ध्वजस्तंभ शनिवारी दिवसभर पुन्हा पूर्ववत करण्यात आला.
रात्री स्थानिक ग्रामस्थांसह जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी ध्वजस्तंभाला पुष्पहार अर्पण करून एकतेचा संदेश दिला. यावेळी पोलीस अधीक्षक बगाटे यांनी नागरिकांनी शांतता आणि सलोखा राखावा, असे आवाहन करत दोषींना लवकरच शोधून काढण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला.
घटनेची माहिती मिळताच देवरूख पोलीस निरीक्षक उदय झावरे आणि सहकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. रात्रभर परिसरात पोलीस गस्त ठेवण्यात आली. शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बाजीराव महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम आणि पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी व पंचनामा केला.
दिवसभर उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम आणि निरीक्षक उदय झावरे राखीव सुरक्षा दलासह परिसरात तैनात होते. शांतता अबाधित ठेवण्यासाठी ग्रामस्थांशी सातत्याने संवाद साधण्यात आला.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रोहित तांबे, सरपंच अंकुश राऊत तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी या निंदनीय कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषींवर त्वरित कारवाईची मागणी केली आहे. पोलिस प्रशासनाने तपास वेगाने सुरू असून लवकरच आरोपीचा शोध घेतला जाईल, असे स्पष्ट केले.

