(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेल्या पेण (जि. रायगड) येथील एका पर्यटकाचा समुद्रात बुडून बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नितीन शंकर पवार (वय ३५, रा. हमरापूर, पेण) असे बेपत्ता पर्यटकाचे नाव असून, घटनेनंतर तिसऱ्या दिवसापर्यंतही त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही.
शनिवार, २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नितीन पवार हे आपल्या कुटुंबासोबत गणपतीपुळे समुद्रकिनारी आले असताना, समुद्रस्नानादरम्यान उसळणाऱ्या लाटांमध्ये ते ओढले गेले आणि क्षणातच बेपत्ता झाले. तत्काळ सुरू झालेल्या शोधमोहीमेत जयगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जयगड व गणपतीपुळे पोलिस चौकीचे कर्मचारी, स्थानिक जीवरक्षक, ग्रामरक्षक दल, पोलिस पाटील आणि ग्रामस्थ सहभागी आहेत.
गणपतीपुळे, भंडारपुळे, मालगुंड, वरवडे, रीळ आणि उंडी या परिसरासह सुमारे वीस किलोमीटरपर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यावर शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. तरीदेखील सोमवारी (२७ ऑक्टोबर) उशिरापर्यंत पवार यांचा कोणताही मागमूस लागलेला नव्हता. पवार यांचे नातेवाईकही घटनेनंतर तातडीने गणपतीपुळे येथे दाखल झाले असून, समुद्रकिनाऱ्यावर चिंतेचे वातावरण पसरले आहे. स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना सावधगिरीचा इशारा देत, समुद्रस्नान करताना जीवरक्षकांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

