(रत्नागिरी)
रत्नागिरी–हातखंबा मुख्य रस्त्यावरील कारवांचीवाडी फाटा परिसरात रविवारी दुपारी सुमारे 3.45 वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या 108 रुग्णवाहिका आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात एका कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 108 रुग्णवाहिका (क्र. MH-08-AP-3894) चालक चेतन मयेकर (रा. वांद्री) नऊ सदस्यांच्या वैद्यकीय पथकासह जिल्हा रुग्णालयाकडे येत होता. कारवांचीवाडी फाट्याजवळ पोहोचताच समोरून येणारी दुचाकी (MH-09-JY-1562) अचानक मुख्य रस्त्यावर आली. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या रुग्णवाहिकेने जोरदार धडक दिल्याने दुचाकीचे मोठे नुकसान झाले.
या अपघातात दुचाकीवरील किरण रामचंद्र नवले (30), त्यांची पत्नी मयुरी (30), मुलगा श्रेयस व मुलगी श्रद्धा (रा. परेल, नीनाई, शाहूवाडी, कोल्हापूर) हे चौघे गंभीर जखमी झाले. धडकेत किरण आणि श्रेयस यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून मयुरी व श्रद्धाच्या पायाला मोठी इजा झाली आहे.
जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सायंकाळपर्यंत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.
रत्नागिरी–हातखंबा मार्गावर वाढता वाहन वेग, कारवांचीवाडी फाट्यावरून अचानक पुढे येणारी वाहने आणि वाढलेली वाहतूक यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून या घटनेने पुन्हा एकदा प्रभावी सुरक्षा उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे.

