(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अमली पदार्थविरोधी मोहिमेंतर्गत गांजा बाळगणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेतलं असून, त्याच्याकडून सुमारे ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या निर्देशानुसार अमली पदार्थविरोधी कारवाया सुरू आहेत.
दिनांक ३ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता रत्नागिरी शहरात कोकणनगर ते प्रशांतनगर दरम्यान गस्त घालत असताना पोलिसांच्या पथकाला एका दुचाकीस्वारावर संशय आला. दुचाकीवर बसलेल्या इसमाची तपासणी केली असता, त्याच्या ताब्यातील निळ्या प्लास्टिक पिशवीमध्ये काळपट-हिरवट रंगाची पाने, फुले, काड्या आणि बोंडे असलेला उग्र वासाचा गांजा सदृश पदार्थ आढळून आला.
पोलिसांनी अटक केलेल्या इसमाचे नाव सत्यजित सदाशिव जाधव (वय ३३) असून, तो सध्या नाचणकर चाळ, एमआयडीसी रत्नागिरी येथे वास्तव्यास आहे. मूळचा इचलकरंजी, जि. कोल्हापूर येथील रहिवासी असलेला हा संशयित आरोपी विक्रीसाठी अमली पदार्थ बाळगत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्याकडून ६९५.५ ग्रॅम वजनाचा गांजा (अंदाजे किंमत ३१,०००/-) तसेच ६५ हजार रुपये किंमतीची ‘ज्युपिटर’ दुचाकी (MH-12-MZ-8492) आणि इतर साहित्य असा एकूण ९६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. ३४०/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ चे कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकाने पार पाडली: पो.उपनिरीक्षक सागर शिंदे, स.पो.फौ. दीपक साळवी, पो.हवा. पंकज पडेलकर, आशीष भालेकर, प्रशांत पाटील, अमोल भोसले, अमित पालवे आणि फॉरेन्सिक विभागातील पो.कॉ. प्रथमेश क्षीरसागर व संदीप हतकर यांनी केली.