(रत्नागिरी)
तालुक्यातील हातखंबा येथील शाळेजवळील धोकादायक वळणावर पुन्हा एकदा टँकर अपघाताच्या उंबरठ्यावर आला. भरधाव वेगात असलेला टँकर नव्या चढणीच्या वळणावर नियंत्रण सुटल्यामुळे पलटी होण्याचा प्रसंग आला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या देत जोरदार आक्रोश केला.
जोपर्यंत संबंधित ठेकेदार घटनास्थळी येत नाही, तोपर्यंत आम्ही हटणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतल्यामुळे काही काळासाठी दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. मात्र, अत्यावश्यक सेवांची वाहने मात्र ग्रामस्थांनी मार्गस्थ होऊ दिली. या भागातील चढणीचे वळण सातत्याने अपघातग्रस्त ठरत असून, रस्ता रुंदीकरण किंवा संरक्षक भिंतींचा अभाव ही गंभीर समस्या बनली आहे.
हातखंबा येथील शाळेजवळ उभ्या असलेल्या खाऊच्या गादीला भरधाव गॅस टँकरने धडक दिल्याची घटना आज सकाळी घडली. या ठिकाणी शाळा सुरू असल्याने आणि विद्यार्थी परिसरात ये-जा करत असल्याने मोठा अनर्थ टळल्याची स्थानिकांची भावना आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर विभागीय अधिकारी माईनकर हेही दाखल झाले. परिस्थिती अधिक बिघडू नये म्हणून पोलिसांनी दंगा काबू पथकही घटनास्थळी पोलिसांनी पाठवले आहे.