(जाकादेवी / संतोष पवार)
राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत मालगुंड येथील जीवन शिक्षण शाळेच्या शतकोत्तर अमृत महोत्सवी सभेत बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, आपल्या जिल्ह्याने देशाला अनेक भारतरत्न दिली आहेत, त्यांचा सदैव आदर्श ठेवून आपण त्यांचे कार्य अवगत केले पाहिजे. मालगुंड गावातील शाळांमधून भविष्यात एक तरी भारतरत्न निर्माण व्हावे, आशावाद व्यक्त व्यक्त करून मालगुंड गावातील जीवन शिक्षण शाळेमध्ये आधुनिक कवितेचे जनक असलेले कविवर्य कवी केशवसुत यांचे वडील शिकले ते शिक्षक होते, ही बाब खूपच स्फुर्तीदायक असल्याचे ते म्हणाले.
१७५ वर्षांपूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या या शाळेतून अनेक विद्यार्थी घडले आहेत.आज या महोत्सवाच्या निमित्ताने खूप वयोवृद्ध असलेले जीवन शिक्षण शाळेचे माजी विद्यार्थी पाहताना आम्हाला अभिमान वाटतो .आजच्या विद्यार्थ्यांनी कोकणातील भारतरत्न मिळालेल्या महनीय व्यक्तींचे कार्य अवगत करून आपणही महान व्यक्तींच्या नखा एवढे तरी कार्य कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी तशी मानसिकता तयार करण्याची गरज असल्याचे ते बोलले.आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मिशन, संकल्प करण्याचे एवढेच नव्हे तर आपल्याला लाभलेल्या सामाजिक, सांस्कृतिक ,साहित्यिक, औद्योगिक क्षेत्राचा वारसा जपण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
वाटद एमआयडीसी शेकडो तरूणांना रोजगार देणार
रत्नागिरी तालुक्यातील वाटद गावी होणाऱ्य एमआयडीसी मुळे संपूर्ण पंचक्रोशीसह मालगुंड गावातील शेकडो तरुणांना नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे काही लोक वाटद एम आयडीसी ला विनाकारण विरोध करत आहेत. या विरोधात काही तथ्य नसून एमआयडीसी प्रदूषणविरहित आहे. त्यामुळे होणाऱ्या एमआयडीसीकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे त्यांनी आवाहन केले. वाटद एमआयडीसीचा विरोध मोडीत काढण्यासाठी सर्व माता भगिनींनी, ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने पुढे येण्याचे आवाहनही उदय सामंत यांनी केले. रत्नागिरीसह वाटद एमआयडीसीसाठी ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचेही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
ईआय तंत्रज्ञानाविषयी जनजागृती महत्वाची
आधुनिक काळात ईआय तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत महत्त्वाचा असून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या उत्कर्षासाठी त्याचा फायदा करून घेणे काळाची गरज आहे. त्याचा दुरुपयोग झाल्यास वाईट स्थिती उद्भवू शकते. ई आय तंत्रज्ञानाबद्दल शिक्षक व पालकांनी सकारात्मक दृष्टीने जनजागृती करावी ,असेही त्यांनी आवाहन केले. आजच्या पालकांनी आपल्या दोन तीन वर्षाच्या छोट्या मुलांना मोबाईल देऊन शांत करण्याऐवजी त्या मुलाला बाराखडी, पाढे तसेच थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाच्या संस्कारक्षम गोष्टींचे शिक्षण देऊन त्यांना भारतीय संस्कृतीचे धडे देण्याचे ही त्यांनी आवाहन केले. शतकोत्तर अमृत महोत्सवाचे औचित्य साधून जीवन शिक्षण शाळेचा पट वाढवण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी अधिक प्रयत्न करण्याचे त्यांनी जाणीवपूर्वक आवाहन केले.
उद्योग मंत्री उदय सामंत यांचा विविध संस्थांतर्फे सत्कार
स्वातंत्र्यपूर्व काळातील स्थापन झालेल्या मालगुंड येथील जीवन शिक्षण शाळेच्या शतकोत्तर अमृत महोत्सव निमित्त उद्योग मंत्री उदय सामंत मालगुंड येथे आले असता त्यांचे शतकोत्तर अमृत महोत्सवी समिती, मालगुंड एज्युकेशन सोसायटी, महिला बचत गट ,विद्यार्थी वर्ग ,ग्रामस्थ यांच्यावतीने मोठ्या उत्साहाच्या वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी ,तहसीलदार,माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाचे ,पंचायत समिती शिक्षण विभागाचे अधिकारी , शतकोत्तर अमृत महोत्सव समितीचे पदाधिकारी, मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन ,जीवन शिक्षण शाळेचे वयोवृद्ध ज्येष्ठ माजी विद्यार्थी पालक ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. जीवन शिक्षण शाळेसाठी लागेल तेवढा निधी देण्याचे नामदार उदय सामंत यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात जाहीर केले.