(पाली / वार्ताहर)
पाली बसस्थानक हे कोकण विभागातील एक प्रमुख बस स्थानक असून ते मुंबई गोवा व मिऱ्या नागपूर या दोन मुख्य राष्ट्रीय महामार्गांवर असल्याने कायमच कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र,गोवा, तळकोकण यासोबतच मुंबई विभागातील प्रवाशांसाठी मध्यवर्ती बसस्थानक म्हणून ओळखले जाते. याकरिताच त्याचे काही महिन्यांपूर्वी अत्यंत दर्जेदार असे नूतनीकरण करून प्रवाशांच्या सेवेत सुसज्ज केलेले आहे याशिवाय पहिल्या सर्वेक्षणात हे स्थानक द्वितीय क्रमांकावर आहे असे प्रतिपादन सिंधुदुर्ग विभागीय वाहतूक अधीक्षक निलेश लाड यांनी केले
पाली बसस्थानकाचे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाचे विभागीय वाहतूक अधीक्षक निलेश लाड, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी अमित कळकुटकी यांनी पाहणी करून द्वितीय टप्प्याचे सर्वेक्षण करून मूल्यांकन केले.यावेळी त्यांनी बसस्थानकाचा परिसर, पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, व्यावसायिक आस्थापना यांची पाहणी करत प्रवाशांची संवाद साधत मूल्यांकन केले.
या सर्वेक्षणासाठी पालीतील प्रतिष्ठित नागरिक सरपंच विठ्ठल सावंत,अॅड.सागर पाखरे, पोलीस पाटील अमेय वेल्हाळ, गुरुनाथ गराकटे यांनी सर्वेक्षणातील मुद्द्यानुसार गुणात्मक मूल्यांकन करून अभिप्राय नोंदविले आहेत. यावेळी लांजा आगार व्यवस्थापक काव्या पेडणेकर, पाली बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक प्रदीप सावंत, सुनील माळी, प्रवासी मित्र उपस्थित होते.
राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री व पालीचे सुपुत्र उदय सामंत यांनी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या निधीतून पाली बस स्थानकाचे गतवर्षीच नूतनीकरण करून सर्व सोयी सुविधा युक्त अत्यंत सुसज्ज वास्तू उभी केली आहे त्यामुळेच पहिल्या सर्वेक्षणात ब वर्ग प्रकारात या स्थानकाला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
पाली बसस्थानक हे व्यापारी दृष्ट्या महत्वाचे व मध्यवर्ती असल्याने कायमच प्रवाशांची रेलचेल असते त्यामुळे बस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. बसस्थानक आवारात पे अँड पार्किंग व सेल्फी पॉईंटची ची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. स्थानकाच्या आवारात बगीचाही प्रस्तावित करण्यात येणार आहे.
फोटो – पाली बस स्थानकाचे स्वच्छ स्थानक अभियानांतर्गत सर्वेक्षण करताना नीलेश लाड, अमित कळकुटकी, काव्या पेडणेकर, विठ्ठल सावंत, अॅड.सागर पाखरे, अमेय वेल्हाळ, गुरुनाथ गराकटे.