(संगमेश्वर / एजाज पटेल)
वाहन चालकाचे शहाणपण आला अंगाशी आल्याची घटना संगमेश्वर येथे घडली. पुराचे पाणी जास्त आहे, या मार्गांवरून जाऊ नकोस स्थानिक लोकांनी सांगूनही शॉर्टकट मार्ग म्हणून गेला आणि पुराच्या पाण्यात अडकला. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मात्र झाले. कारण या गाडीतून मिठाई पॅकिंग करण्याचे बॉक्स वाहतूक केले जात होते. पुराच्या पाण्यात गाडी अडकल्याची घटना रामपेठ येथून भिडे वखारकडे जाणाऱ्या मार्गांवर घडली आहे.
गेले दोन दिवस पावसाने चांगलेच धुमाशन घातले असून सलग दोन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे शास्त्री नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ़ होऊन पुराचे पाणी रामपेठ तसेच नावडी भागातील सखल भागात साचू लागले होते. तर अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचे पहायला मिळत होते. त्यातच विश्रांती न घेता पावसाच्या जोरधार सरी बरसतच होत्या. त्यामुळे वाहन वर्दलीसह जनजीवनवरही याचा चांगलाच परिणाम झाला आहे.
मुंबई – गोवा महामार्गावरून रामपेठ मार्गे संगमेश्वर येथे जाण्यासाठी एक चारचाकी मालवाहू गाडी आली. ती रामपेठ येथे आली असता येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल शेट्ये तसेच अन्य काही लोकांनी गाडी चालकाला तो जात असलेल्या पुढील मार्गांवर पाणी भरले असल्याने भिडे वखार येथून न जाता दुसऱ्या मार्गाने जाण्याचा सल्ला दिला. त्या सल्ल्याला धुडकावत जवळचा मार्ग म्हणून पाणी भरलेल्या रस्त्यावरून गाडी नेण्याचा धाडस करत त्याने पुराच्या पाण्यातून काही अंतरापर्यत मार्गही काढला. मात्र भिडे वखारी च्या समोर पाण्याची उंची जास्त असल्याने चालक चांगलाच गडबडला. चहुबाजूला पाणीच पाणी आणि मध्येच त्याची गाडी अडकल्याने त्याने गाडी तेथेच सोडून पाण्यातून मार्ग काढत सुरक्षित स्थळी आला. आणि पहिला सुटकेचा श्वास सोडला.
येथे मंद गतीने का पाणी वाढत होते. गाडीचा अर्धा भाग पाण्यात होता. पाऊस थथांबण्याचे चिन्ह नव्हते त्यामुळे काहीही करून गाडी पाण्यातून काढण्यासाठी काही स्थानिक लोकांच्या मदतीने गाडी ढकलत ढकलत पाण्यातून बाहर काढण्यात आली. मात्र यावेळी एकच चर्चा होती ती म्हणजे चालकाचा शहाणपण त्याच्या चांगलाच अंगलट आला याची!

