(दापोली)
माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट, एनेबल इंडिया आणि स्टार ग्रामीण रोजगार व प्रशिक्षण संस्था यांच्या मार्फत दिनांक १० जून ते २१ जून २०२५ या कालावधीत दिव्यांगांसाठी कागदी, कापडी पिशव्या, लखोटे व फाईल बनविण्याचा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. या प्रशिक्षणात पाजपंढरी व परिसरातील २४ दिव्यांगांनी सहभाग नोंदवला.
आरशेटी मार्फत श्री. प्रसाद कांबळे व सौ. अनिता मोरे यांनी मार्गदर्शक म्हणून कार्य केले. सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत चालणाऱ्या वर्गांमध्ये प्रशिक्षणार्थी तल्लीन होऊन प्रशिक्षण घेत असल्याचे दिसत होते.
प्रशिक्षणादरम्यान दापोली, हर्णे, चंद्रनगर, नारगोली परिसरातून विविध मान्यवरांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. यामध्ये नगरसेविका दापोली नगरपरिषद तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा सौ. साधना बोथरे, पोलीस उपनिरीक्षक श्री. दत्ता पवार (हर्णे पोलीस ठाणे), श्री. राजेंद्र मोहिते (आडे पोलीस ठाणे), पोलीस पाटील श्री. जनार्दन चौगुले (पाजपंढरी), श्री. रमेश भुवड, श्री. शैलेश जाधव (सामाजिक कार्यकर्ते, दापोली), सौ. रेखा बागुल, कुमारी माहेश्वरी विचारे (आनंद फाउंडेशन, जळगाव), श्री. चंद्रकांत भडवळकर (पोलीस पाटील, नारगोली), तसेच पत्रकार श्री. प्रसाद रानडे, संदीप गोरीवले, संदीप राऊत व आंजर्ले हायस्कूलचे मान्यवर उपस्थित होते.
प्रशिक्षणानंतर प्रात्यक्षिक परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षेला उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थी यशस्वी झाले. प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम दापोली पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. दिलीप मर्चंडे व विस्तार अधिकारी श्री. सुनील भुसारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून व्यवसायात स्थिर झालेल्या पाच दिव्यांगांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये श्री. मंगेश महाडिक (आंजर्ले), सौ. लक्ष्मी चौगुले, श्री. महेंद्र रघुवीर (पाजपंढरी), श्री. यासीन पठाण (दापोली) व श्री. रवींद्र गायकवाड (जळगाव) यांचा समावेश होता.
माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराबाबत सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. मर्चंडे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच दिव्यांगांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी पंचायत समिती नेहमी पुढाकार घेईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
उद्घाटन व समारोप प्रसंगी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते श्री. राजेंद्र बोत्रे यांनी दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. दिव्यांगांसाठी कार्यरत असलेले श्री. ताजने यांनी देखील प्रशिक्षणास सदिच्छा भेट दिली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माझी सहेली मार्फत श्री. अविनाश चव्हाण, श्री. सुनील देसाई, श्री. नीरज गुप्ता, श्री. सिद्धेश सातनाक, श्री. प्रथमेश नाटुस्कर, सौ. ज्योती पाटील व सौ. अमिषा मयेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.