(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर चौकात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. पोलिसांची अपुरी उपस्थिती आणि नियोजनाचा अभाव यामुळे चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या, प्रवाश्यांना तासनतास कोंडीत अडकून राहावे लागत होते.
वाहतूक कोंडी इतकी गंभीर बनली होती की अत्यावश्यक सेवांतील रुग्णवाहिकांनाही मार्ग काढणे कठीण जात होते. चौकात पोलीस चौकी असतानाही तेथे नियमित पोलीस उपस्थित नसल्याचे चित्र दिसून येत होते. विशेष म्हणजे चौकाच्या नजरेसमोरच पोलीस ठाणे असूनही कर्णकर्कश हॉर्नचा आवाज, वाहनांची गर्दी आणि वाढती वाहतूक कोंडी याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली होती.
केव्हातरी अधूनमधून एका पोलिसावर संपूर्ण वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी सोपवली जात होती; मात्र वाढत्या वाहनसंख्येमुळे ही व्यवस्था पूर्णपणे अपुरी ठरत होती. परिणामी, काही वेळा स्थानिक नागरिकांनाच रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करावा लागत होता, ही बाब प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी होती.संगमेश्वर चौकातील वाढती वाहतूक कोंडी आणि पोलिसांच्या कमतरतेबाबत डिजिटल मिडिया तसेच वृत्तपत्रांमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच जिल्हा पोलीस प्रशासनाने याची तातडीने दखल घेतली. जिल्हा वाहतूक पोलिसांची त्वरित चौकात तैनाती करण्यात आली असून स्थानिक पोलीसही महामार्गावर रात्री उशिरापर्यंत उपस्थित राहू लागले आहेत.
या उपाययोजनांमुळे वाहतूक लक्षणीयरीत्या सुरळीत झाली असून वाहनचालक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

