(दापोली)
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थी आणि शाळांचा गुणगौरव सोहळा आज उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम सोहणी वाद्यमंदिर, दापोली येथे आयोजित करण्यात आला होता. सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते, तर अध्यक्षस्थान गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांनी भूषविले.
सन २०२३-२४ व २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांतील व्हिजन दापोली शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी, पाचवी आणि आठवी), तसेच नवोदय आणि NNMS परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या शाळांचा एकूण १४० गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यांना प्रशस्तीपत्रांसह प्रबोधनात्मक व स्पर्धेसाठी उपयुक्त अशी पुस्तके भेट देण्यात आली.
राज्यमंत्री कदम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना म्हटले, “मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा माझ्या हस्ते सत्कार होतोय. संस्कृती टिकवणे आपले आद्य कर्तव्य आहे. जि. प. शाळेत शिकणारा विद्यार्थी जेव्हा IPS अधिकारी होईल तो दिवसच व्हिजन दापोलीचे खरे यश ठरेल,” अशी भावना व्यक्त केली. यावेळी पी. एम. श्री स्कूल, वाकवली या शाळेला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल शाळेचा विशेष सन्मान कदम यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांनी प्रास्ताविक करत व्हिजन दापोलीच्या माध्यमातून झालेल्या विद्यार्थी विकासाचे चढते आलेख मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक संजय मेहता, जयंत सुर्वे, मानसी सावंत आणि मानसी जालगावकर यांनी केले. शेवटी व्हिजन दापोलीचे अध्यक्ष धनंजय सिरसाट यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी विस्तार अधिकारी बळीराम राठोड, रेखा पवार यांच्यासह सर्व केंद्रप्रमुख, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी व तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात दापोली तालुक्यात घरकुल योजनेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचाही पंचायत समितीमार्फत राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.