(रत्नागिरी)
शहरातील मिरकरवाडा खडक मोहल्ला परिसरात आज शनिवारी (दिनांक २ ऑगस्ट २०२५ ) दुपारी कामादरम्यान घडलेल्या भयंकर घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. एका मोबाईल शॉपीच्या फर्निचरच्या कामात गुंतलेल्या दोन चुलत नात्यातील कामगारांमध्ये झालेल्या वादातून एका तरुणाचा निर्घृण खून झाला. प्रेमप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून समोर आली आहे.
गोरखपूरहून रत्नागिरीत फर्निचरच्या कामासाठी आलेल्या चार जणांच्या पथकात प्रिन्स सहानी (वय अंदाजे २२) आणि त्याचा चुलत मामा हे दोघेही सहभागी होते. मिरकरवाडा खडक मोहल्ला येथे एका नव्या मोबाईल शॉपीमध्ये सजावटीचे काम सुरू असताना त्यांच्यात गावातील एका मुलीच्या प्रेमसंबंधावरून जुंपलेली शाब्दिक बाचाबाची पाहता पाहता रक्तरंजित हाणामारीत परिवर्तीत झाली. रागाच्या भरात मामाने सुतारकामात वापरली जाणारी धारदार आरी भाच्याच्या छातीत खुपसली. गंभीर दुखापतीमुळे प्रिन्सचा जागीच मृत्यू झाला.
हत्या करून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तत्काळ ११२ वर संपर्क साधत पोलिसांना कळवले. काही मिनिटांतच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली. आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी दुसरे पथक थेट रेल्वे स्थानकावर पाठवले. संशयितांचे मोबाईल लोकेशन तपासून रेल्वे स्थानकावरून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात हलवला आहे. या घटनेमुळे मिरकरवाडा परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. प्रेमप्रकरणासारख्या नाजूक कारणावरून घडलेल्या या हिंसक घटनेने स्थानिकांना हादरवून सोडले आहे. या प्रकरणी सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत असून, लवकरच या गुन्ह्याचा संपूर्ण तपशील स्पष्ट होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.