(नवी दिल्ली)
भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) या सरकारी दूरसंचार कंपनीने खासगी कंपन्यांना धक्का देत स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एक आकर्षक ‘फ्रीडम ऑफर’ जाहीर केली आहे. या ऑफर अंतर्गत, ग्राहकांना केवळ १ रुपयात अमर्यादित कॉल्स, २ जीबी डेटा प्रतिदिन आणि मोफत एसएमएस मिळणार आहेत. ही योजना टेलिकॉम क्षेत्रात मोठा बदल घडवणारी ठरत असून, डिजिटल स्वातंत्र्याची खरी अनुभूती देणारी मानली जात आहे.
योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये :
-
✅ फक्त १ रुपयात रिचार्ज प्लॅन
-
✅ दररोज २ जीबी हाय-स्पीड डेटा
-
✅ अमर्यादित कॉलिंग (कोणत्याही नेटवर्कवर, राष्ट्रीय रोमिंगसह)
-
✅ दररोज १०० मोफत एसएमएस
-
✅ योजनेची वैधता – ३० दिवस
-
✅ नवीन व विद्यमान ग्राहकांसाठी उपलब्ध
१ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ दरम्यान ही योजना देशभरातील सर्व बीएसएनएल टेलिकॉम सर्कलमध्ये उपलब्ध आहे. नवीन ग्राहकांना केवळ १ रुपयात नवीन सिम कार्ड मिळेल आणि याच रक्कमेत ही संपूर्ण योजना सक्रीय होईल. बीएसएनएलच्या अधिकृत मोबाईल अॅप किंवा वेबसाईटवरून विद्यमान ग्राहकदेखील ही योजना सोप्या पद्धतीने अॅक्टिव्हेट करू शकतात. त्यामुळे ही योजना केवळ नवीनच नव्हे, तर जुन्या ग्राहकांसाठीही फायदेशीर ठरते.
टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) च्या अलीकडील अहवालानुसार, बीएसएनएल आणि व्होडाफोन-आयडिया (Vi) यांच्या ग्राहक संख्येत घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर बीएसएनएलने टेलिकॉम मार्केटमध्ये पुन्हा पाय रोवण्यासाठी ही योजना आणली आहे. या माध्यमातून कंपनी नवे ग्राहक आकर्षित करणार असून, विद्यमान ग्राहकांनाही सेवा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. बीएसएनएलचा हा १ रुपयाचा प्लॅन म्हणजे कंपनीच्या डिजिटायझेशन आणि ग्राहक केंद्रित धोरणाचा भाग आहे. खाजगी कंपन्यांच्या महागड्या प्लॅन्समुळे त्रस्त असलेल्या ग्राहकांसाठी ही योजना एक स्वस्त, दर्जेदार आणि विश्वासार्ह पर्याय ठरतोय.
नवीन ग्राहकांनी जवळच्या बीएसएनएल ग्राहक सेवा केंद्रात जाऊन सिम घेऊन रिचार्ज करावा लागेल. सध्याचे ग्राहक BSNL Mobile App किंवा www.bsnl.co.in वरून या योजनेचा लाभ घेऊ शकतात. बीएसएनएलची १ रुपयात उपलब्ध फ्रीडम ऑफर ही केवळ योजना नाही, तर डिजिटल भारताच्या दिशेने एक मोठं पाऊल आहे. अल्पदरात उच्च सुविधा देणाऱ्या या योजनेमुळे ग्राहकांना खरी ‘डिजिटल स्वातंत्र्य’ मिळत असून, खासगी कंपन्यांसाठी हे एक मोठं आव्हान ठरत आहे.