(नवी दिल्ली)
राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या सुरक्षा व्यवस्थेत गंभीर निष्काळजीपणा उघडकीस आला आहे. शनिवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेच्या एका पथकाने, मॉक ड्रिलच्या (सुरक्षा चाचणी) अंतर्गत, लाल किल्ल्याच्या परिसरात डमी बॉम्ब घेऊन सहज प्रवेश केला. ही प्रक्रिया स्वतंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेची वस्तुस्थिती तपासण्यासाठी करण्यात आली होती. मात्र, या चाचणीमुळे सुरक्षेच्या पातळीवर अनेक ठिकाणी ढिसाळपणा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सदर घटनेची गंभीर दखल घेत उपायुक्त राजा बांठिया यांनी तात्काळ कारवाई करत कर्तव्यावर तैनात असलेल्या सात पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतात, आणि या राष्ट्रीय कार्यक्रमाला देशभरातील मान्यवर, सुरक्षा अधिकारी, प्रसारमाध्यमे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. अशा वेळी सुरक्षाव्यवस्थेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर त्रुटी असणे अत्यंत चिंताजनक आहे.
ही बाब समोर आल्यानंतर पोलिस दल आणि अन्य सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, उपायुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ संपूर्ण सुरक्षा आराखड्याचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये सुरक्षारक्षकांची फेरतपासणी, त्यांच्या जबाबदाऱ्यांचे पुनर्नियोजन, अत्याधुनिक उपकरणांचा वापर, सीसीटीव्ही आणि बॉम्ब डिटेक्शन यंत्रणा अधिक सक्षम करणे, तसेच ड्रोनद्वारे देखरेख वाढवणे यासारख्या बाबींचा समावेश आहे.
लाल किल्ला हा भारताचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय अस्मितेचा प्रतीक आहे. अशा महत्त्वाच्या स्थळावर सुरक्षा व्यवस्थेत अशा प्रकारे त्रुटी आढळणं हे गंभीर आहे आणि भविष्यात कोणताही धोका टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित करते. स्वातंत्र्य दिनासारख्या अत्युच्च संवेदनशीलतेच्या दिवशी कोणतीही दुर्लक्षता किंवा तयारीतील त्रुटी परवडणारी नसते. त्यामुळे आगामी काळात सुरक्षा यंत्रणा अधिक कडक आणि अचूक पद्धतीने काम करेल, अशी अपेक्षा आहे.