(नाशिक / प्रतिनिधी)
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागातर्फे गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संवर्धन अभियान, सीडबॉल रोपण उपक्रम, माता सरस्वती विद्यारंभ सोहळा आणि हजारो बालसंस्कार वर्गांना चालना देण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य मोठ्या जोमाने आणि उत्साहाने सुरू आहे.
सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री.आण्णासाहेब मोरे यांनी बाल संस्कार अर्थात मूल्यसंस्कार विभागाला झुकते माप दिले असून गावागावात बालसंस्कार केंद्र उभारून नव्या पिढीला सुसंस्कारित करा अशी आज्ञा केली आहे. त्यानुसार बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाने या कार्याला गती देण्यासाठी अत्यंत नियोजनपूर्वक प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून सध्या संपूर्ण राज्यभर बालसंस्कार वर्गांना चालना आणि बळ देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने बाल संस्कार वर्गांमध्ये बालकांना संस्कारक्षम करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविले जात असून नवीन बालसंस्कार केंद्रांची उभारणी देखील केली जात आहे. तसेच मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रमही घेतले जात आहेत. याबरोबरच आदर्श बालसंस्कार वर्गांसाठी इच्छुक सेवेकरी प्रतिनिधींना ऑनलाइन प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू आहे. एक राखी भारतीय सैनिकांसाठी या अभिनव उपक्रमाकरिता मुला-मुलींकडून राख्या तयार करून घेतल्या जात आहेत. या राख्या देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांना पाठविण्यात येणार आहेत. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
माता सरस्वती व मातृ-पितृ पाद्यपूजन सोहळा
आजची पिढी सुसंस्कारित होऊन मातृ-पितृ भक्त बनावी आणि त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी माता सरस्वतीचा आशीर्वाद लाभावा या उदात्त हेतूने बाल संस्कार विभागातर्फे प्रत्येक बालसंस्कार केंद्रात, गावागावात, शहरात माता सरस्वती विद्यारंभ सोहळा आणि मातृ- पितृ पाद्यपूजन म्हणजे आपल्या आई-वडिलांचे पाद्यपूजन करण्याचा अत्यंत हृदयस्पर्शी आणि भावपूर्ण उपक्रमही सध्या सर्वत्र राबविला जात आहे. आपल्या मातापित्याचे पाद्यपूजन करताना अनेक बालकांना गहिवरून येते आणि पाद्यपूजन करणाऱ्या आपल्या मुलांना पोटाशी कवटाळून जन्मदात्यांनाही गलबलून येते असा हा भावपूर्ण कार्यक्रम संस्मरणीय ठरतो. ही नवी पिढी आज्ञाधारी, सदाचारी आणि संस्कारक्षम बनली तर आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठविण्याचे प्रमाण कमी होऊन वृद्धाश्रमुक्त भारत ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होईल. याकरिता बाल संस्कार व युवा प्रबोधन विभागातर्फे मूल्यसंस्कार चळवळ अधिकाधिक गतिमान केली जात आहे. प्रत्येक सेवा केंद्रात बालसंस्कार वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीने हा विभाग प्रयत्नशील असून अनाथालयातही बाल संस्कार वर्ग सुरू केले जात आहेत.
गर्भवती माता आणि किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन
शिशू संस्कार केंद्रासाठी अंगणवाड्यामध्ये जाऊन बहुमोल माहिती दिली जाते. आशाताईंच्या मदतीने गावागावातील गर्भवती महिलांना एकत्र करून त्यांना सात्विक आहार तसेच वैचारिक आणि बौद्धिक विकासासाठी तर किशोरवयीन मुलींना योग्य वयात होणारे शारीरिक व मानसिक बदल या विषयावर संवाद साधण्यात येतो आणि त्यांना निरोगी शारीरिक व सुदृढ मानसिक आरोग्यासाठी मार्गदर्शन केले जाते.
पर्यावरणपूरक गणपती आणि वृद्धाश्रमात रक्षाबंधन
मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रत्येक सेवाकेंद्रात राख्या तयार करण्याचा कार्यक्रम देण्यात आला आहे. तसेच आपापल्या भागातील वृद्धाश्रम आणि अनाथालयात हीच मुले रक्षाबंधनाचा सोहळा साजरा करणार आहेत. येत्या गणेशोत्सवासाठी मुलांना पर्यावरणपूरक शाडूच्या मातीचा गणपती तयार करण्याचा उपक्रम देण्यात आला आहे. ही मुले आवडीने गणेशमूर्ती तयार करण्यात मग्न दिसतात. बालसंस्कार केंद्र जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांबरोबर ऑनलाईन मिटिंग देखील घेण्यात येते तसेच दर पंधरा दिवसांनी युवा प्रबोधन विभागातर्फे ऑनलाईन बैठक घेतली जाते. दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे मुलांचे प्रश्न आणि समस्या यावर पालकांसाठी समुपदेशन केले जाते.येत्या १५ ऑगस्ट निमित्त वृद्धाश्रममुक्त भारत अभियानाचा एक भाग म्हणून वृद्धाश्रमांना भेटी देण्यात येणार असून ज्येष्ठ नागरिकांशी आपुलकीने संवाद साधला जाणार आहे.
वृक्ष लागवड, संवर्धन व सीडबॉल रोपण
ग्लोबल वॉर्मिंगचा धोका ओळखून बालसंस्कार व युवा प्रबोधन आणि पर्यावरण प्रकृती विभाग यांच्या वतीने हजारो युवक युवतींना सोबत घेऊन वृक्ष लागवड व संवर्धन आणि सीडबॉल रोपण हे अभियान हाती घेतले आहे. या महावृक्षारोपण अभियानांतर्गत मुले मुली ठिकठिकाणी हजारो रोपांची लागवड आणि संगोपनाचे कार्य करतात. त्याचप्रमाणे लाखोंच्या संख्येत सीडबॉलचे रोपण करण्याचा कार्यक्रमही सुरू आहे. संपूर्ण राज्यभर हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जातोय. हरित भारत घडविण्यासाठी ही युवा पिढी निसर्ग देवतेची सेवा करताना पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा देखील करते. या अभियानांतर्गत प्रत्येक विद्यार्थी स्वतः आणि आई-वडिलांच्या वतीने अशा एकूण तीन वृक्षांची लागवड करतो.
राष्ट्र कल्याण आणि समाज हितासाठी ठिकठिकाणी प्रशिक्षण
राष्ट्र कल्याण आणि समाज हितासाठी गुरुपीठातर्फे बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाकडून स्वसंरक्षण तंत्र, वास्तुशास्त्र, वेद विज्ञान संशोधन याबाबत प्रशिक्षण दिले जाते. दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी गुरुपीठात प्रशिक्षण देण्यात येते तर दर महिन्याच्या पहिल्या रविवारी अहिल्यानगरमध्ये,दुसऱ्या रविवारी जळगाव आणि नृसिंहवाडीमध्ये, तिसऱ्या रविवारी धुळे आणि शेगाव येथे प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जातो. आजवर हजारो सेवेकर्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन सर्वसामान्य गरजू लोकांपर्यंत हे ज्ञान पोहोचविले आहे.