(रत्नागिरी)
रत्नागिरी येथील एक दिव्यांग व्यक्ती आपल्या पत्नीसमवेत हज यात्रेसाठी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील रियाज टूर अॅण्ड ट्रॅव्हल्स या संस्थेच्या माध्यमातून गेले होते. या दांपत्याने प्रवासातील आवश्यक सोयीसुविधांसाठी संस्थेला तब्बल १६ लाख ८० हजार रुपये अदा केले. मात्र, एवढी रक्कम दिल्यानंतरही त्यांना अपेक्षित सुविधा मिळाल्या नाहीत, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
यात्रेदरम्यान या दांपत्याला हॉटेलमध्ये स्वतंत्र खोली देण्यात आली नाही, प्रवासासाठी कोणतीही वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली नाही, दिव्यांग व्यक्तीसाठी मदतनीस नेमण्यात आला नाही, तसेच मार्गदर्शक (गाईड) देखील उपलब्ध करून दिला गेला नाही. त्यामुळे ऐतिहासिक, धार्मिक आणि प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्याची संधी त्यांना मिळाली नाही. शिवाय, प्रवासादरम्यान दिव्यांग यात्रेकरू आजारी पडल्यावरही कोणतीही वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आली नाही.
गाईड नसल्यामुळे आणि स्थानिक भाषा न समजल्यामुळे परक्या देशात या दांपत्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. एवढ्या मोठ्या रकमेसमोर मिळालेल्या अत्यंत अपुऱ्या सेवा यामुळे ही सरळसरळ फसवणूक असल्याचे मत एजाज इब्जी या हज यात्रेकरूने व्यक्त केले आहे.
या प्रकरणी त्यांनी संबंधित टूर व्यवस्थापकाला कायदेशीर नोटीस पाठवली असून, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने एजाज इब्जी यांनी आता आपण रत्नागिरी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले.
याशिवाय, ते पर्यटन मंत्रालय, हज कमिटी, दिव्यांग कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र राज्य शासन तसेच रत्नागिरी पोलिस ठाणे यांच्याकडेही संबंधित टूर संस्थेविरोधात तक्रार दाखल करणार आहेत. याबाबत त्यांनी टूर व्यवस्थापकाला पूर्वसूचना दिली असून लवकरच सर्व संबंधित विभागांमध्ये अधिकृत पातळीवर तक्रार दाखल होणार असल्याचे सांगितले.