(ठाणे)
मुरबाड तालुक्यातील सिद्धगड परिसरात ट्रेकिंगदरम्यान नवी मुंबईतील तळोजा भागात राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुण गिर्यारोहकाचा ११०० फूट खोल दरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. साईराज चव्हाण (वय २२) असं या तरुणाचं नाव असून, तब्बल ४८ तास चाललेल्या अथक शोध व बचाव मोहिमेनंतर स्थानिक गिर्यारोहक पथकाला त्याचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आलं. ही घटना रविवारी (१५ जून) सिद्धगड परिसरात घडली होती. याप्रकरणी मुरबाड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान गीते यांनी दिली आहे.
विनामार्गदर्शक ट्रेक आणि अपघात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईराज चव्हाण रविवारी सुट्टीच्या दिवशी आपल्या १३ ट्रेकर मित्रांसोबत सिद्धगड ट्रेकसाठी गेला होता. मात्र, या पथकाकडे कोणताही व्यावसायिक मार्गदर्शक नव्हता, तसेच योग्य ट्रेकिंग उपकरणांचाही अभाव होता. ट्रेक दरम्यान सर्वच सदस्य मार्ग चुकले होते, पण काही तासांच्या शोधानंतर ते सुरक्षित परतले. दुर्दैवाने, साईराज एका उंच कड्यावरून घसरून थेट ११०० फूट खोल दरीत कोसळला.
शोध आणि बचाव मोहीम: ४८ तासांचे आव्हान
घटनेची माहिती मिळताच अवघ्या २० मिनिटांत शोध व बचाव कार्य सुरू करण्यात आले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदतीने महाराष्ट्र माउंटेनियरिंग रेस्क्यू टीमशी तात्काळ संपर्क साधण्यात आला. या टीमचे समन्वयक राहुल मेश्राम यांच्या नेतृत्वाखालील पथकासोबत स्थानिक गिर्यारोहक संघटना – सह्यागिरी ट्रेकर्सचे दीपक विशे आणि डेला अॅडव्हेंचर्सचे गणेश गीते यांच्या पथकांनी मोहीम राबवली. घटनास्थळी मुसळधार पाऊस, धुकं आणि घनदाट जंगल असल्याने रात्रीच्या वेळी बचावकार्य थांबवावं लागलं. मात्र दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच शोध पुन्हा सुरू झाला. हवामानातील अडथळ्यांवर मात करत अखेर मंगळवारी दुपारी साईराजचा मृतदेह सापडला. तो मुरबाडच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला.
“हे आमच्या आयुष्यातील सर्वात कठीण बचावकार्य” – दीपक विशे
सह्यागिरी ट्रेकर्सचे दीपक विशे म्हणाले, “आमच्यासह २० जणांच्या पथकानं शोधमोहीम राबवली. आमच्या आजवरच्या अनुभवात हे सर्वात कठीण बचावकार्य होतं. जोरदार वारा, मुसळधार पाऊस आणि जवळजवळ शून्य दृश्यमानता – या सर्व अडचणींमध्ये आम्ही चार ते पाच वेळा दरीत खाली उतरलो. हे क्षेत्र अत्यंत धोकादायक असून, अनुभवी ट्रेकर्सदेखील उन्हाळ्यात या मार्गाचा वापर टाळतात. हे अत्यंत हृदयद्रावक आहे की, या तरुण ट्रेकर्सनी त्यांच्या पहिल्याच ट्रेकमध्ये इतका कठीण मार्ग निवडला.”
प्रशासन व स्थानिकांनी दाखवली तत्परता
शोध व बचाव मोहिमेत मुरबाड पोलीस, तहसील कार्यालय, प्रशिक्षित गिर्यारोहक आणि स्वयंसेवकांनी उल्लेखनीय सहभाग घेतला. त्यांच्याच प्रयत्नांमुळे मृतदेह सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं.