(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे चंद्रकांत गणू बांबाडे यांच्या मालकीच्या काजू सोलण्याच्या कारखान्याला आज (शनिवारी) सकाळी भीषण आग लागली. अचानक इमारतीतून धुराचे लोळ बाहेर पडू लागल्याने काही वेळातच आगीच्या ज्वाला भडकल्या.
ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र काजू बिया असल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर देवरुख नगर पंचायतच्या अग्निशमन बंबाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. तरीही कारखान्यातील मशिनरी व काजू बिया जळून खाक झाल्याने चंद्रकांत बांबाडे यांचे सुमारे ₹७३ लाखांचे नुकसान झाले.
धामणी येथे महामार्गालगत बांबाडे यांच्या इमारतीत काजू सोलण्याचा कारखाना होता. सकाळी बंद इमारतीतून धूर निघू लागला आणि काही क्षणांतच आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या. स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आटोक्यात न आल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
अग्निशमन जवानांनी ग्रामस्थांच्या मदतीने जोरदार पाण्याचा मारा करून आग विझवली. मात्र तोपर्यंत आतल्या मशिनरी व काजू बिया आगीच्या भक्ष्यस्थानी पडून राख झाली होती.
आग लागण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. या आगीत स्टेम कुकर, काजू ड्रायर मशीन, ऑटोमॅटिक काजू कटर मशीन, पोलिंग मशीन, कॉम्प्रेसर हँड कटर, ग्रँडिंग मशीन, मॉश्वर ड्रायर तसेच सुमारे ३ टन मिक्स काजू गर आणि ७ टन कच्चा माल जळून खाक झाला.
ग्राम महसूल अधिकारी व्ही. व्ही. घोलप यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार इमारत व यंत्रसामुग्रीसहित एकूण नुकसान ₹७२,५१,२६७ इतके झाले असून, सदर पंचनामा देवरुख तहसीलदारांना सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.