(विटा / सांगली)
विट्यात आज (सोमवारी) सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत भांड्याच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दोन वर्षांच्या बालिकेसह एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली होती.
ही घटना विटा शहरातील सावरकरनगर परिसरात सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. विष्णू पांडुरंग जोशी (वय ४७), सुनंदा विष्णू जोशी (वय ४२), प्रियांका योगेश इंगळे (वय २५) आणि सृष्टी योगेश इंगळे (नात) (वय २) अशी मृतांची नावे आहेत. सर्वजण एकाच कुटुंबातील असून त्यांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.
विष्णू जोशी यांच्या ‘जय हनुमान स्टील सेंटर’ या भांड्याच्या दुकानात पहिल्या मजल्यावर अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. दुकानासोबतच घर असलेल्या या तीन मजली इमारतीत कुटुंबातील सदस्य वरच्या मजल्यांवर अडकले होते. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही.
आगीची माहिती मिळताच विटा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. स्थानिक नागरिकांनीही पाण्याचे बादले आणि पाइपच्या साहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, इमारतीभोवती घरे चिटकून असल्याने आणि ज्वालांची तीव्रता वाढल्याने बचावकार्यात अडथळे येत होते.
यानंतर कडेगाव, कुंडल, उदगिरी, पलूस आणि तासगाव येथील अग्निशमन दलांच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली, परंतु तोपर्यंत चार निरपराध जीव गेले होते.
वीजवाहिनीत दोष निर्माण झाल्यामुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून, पोलिस आणि विद्युत विभागाकडून सखोल चौकशी सुरू आहे.

