(पुणे)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना कृषी विभागातील कथित घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट मिळाल्यानंतर त्यांच्या पुन्हा मंत्रिमंडळात प्रवेशाच्या शक्यतेला चालना मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, धनंजय मुंडे यांच्यावर कृषी विभागातील घोटाळ्याचे आरोप झाले होते. आता त्यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. मात्र, त्यामुळे त्यांच्यावर झालेली बदनामी आणि त्यांनी सहन केलेला मानसिक त्रास भरून निघणारा नाही. त्यांच्या दुसऱ्या प्रकरणात अद्याप न्यायालयीन चौकशी सुरू आहे. त्या चौकशीमधून वस्तुस्थिती समोर आल्यानंतर, जर त्यांचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले, तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ, असे पवार यांनी सांगितले.
धनंजय मुंडे यांच्यावर कृषी विभागाच्या कार्यकाळात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले होते. भाजप आमदार सुरेश धस यांनी सुमारे 200 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता, तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तो आकडा 245 कोटी रुपये असल्याचा दावा केला होता. हे आरोप त्यांनी कृषी साहित्याच्या थेट खरेदी व वितरणासंदर्भात केले होते. मात्र, या संपूर्ण प्रकरणात आता मुंबई उच्च न्यायालयाने मुंडेंना दिलासा दिला असून, राज्य शासनाच्या निर्णयास वैध ठरवले आहे. कृषी विभागाने शेतीपूरक साहित्य खरेदीसाठी राबवलेल्या विशेष कृती आराखड्यांतर्गत घेतलेल्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या दोन्ही याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत.
दरम्यान, अजित पवार यांनी पुण्यातील वाहतूक समस्यांबाबत देखील महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लवकरच पुणे दौऱ्यावर येणार असून, त्यांच्या भेटीद्वारे शहरातील वाहतूक कोंडी, महामार्ग प्रकल्प व प्रस्तावित रेल्वे मार्गांबाबत चर्चा होणार आहे. त्याआधी जर मी दिल्लीत गेलो, तर तिथेच त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करेन, असे त्यांनी स्पष्ट केले. पुण्यातील वाहतूक सुधारण्यासाठी तळेगाव, चाकण, वाघोली, उरळी आणि सोलापूर-पुणे रोड यांना जोडणारा नवीन रेल्वे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. याशिवाय मिरज रोडवरून मिरज रेल्वेला जोडणारी दुसरी लाईनदेखील नियोजनात आहे. या प्रकल्पांमुळे पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.