(पुणे)
कोथरूड गोळीबार प्रकरणातील फरार गुंड निलेश घायवळ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या ताफ्यातील काळ्या स्कॉर्पिओ कारचे व्हिडिओ आता समोर आले असून, तो नेहमी या ताफ्यासह बडेजावात फिरताना दिसत होता. खंडणी वसुली आणि दहशत निर्माण करण्यासाठी तो महागड्या गाड्यांच्या ताफ्याने रस्त्यावर उतरत असे.
घायवळच्या सर्व गाड्यांचे नंबर खास फॅन्सी होते. विशेष म्हणजे त्याच्या प्रत्येक कारचा नंबरचे आकडे “8055” असे होते, या आकड्यांना शब्दांत वळण दिल्यास त्याचा अर्थ BOSS असा होतो. त्यामुळे पुण्यात “आपणच बॉस” असल्याची प्रतिमा तयार करण्याचा त्याचा हेतू स्पष्ट होता.
मिळालेल्या माहितीनुसार, घायवळने गेल्या काही वर्षांत खंडणी वसुलीचा आवाका वाढवला होता. पश्चिम महाराष्ट्रातील पवनचक्की कंपन्यांकडून खंडणी उकळण्याचे काम तो करत असल्याची चर्चा होती. त्यामुळे प्रभाव टाकण्यासाठी तो नेहमी आलिशान ताफ्यासह फिरत असे.
धाराशिवपासून मंत्रालयापर्यंत त्याचे संपर्क वाढले होते. बड्या राजकीय नेत्यांशी उठबस असणे आणि कुणालाही न जुमानणे हा त्याचा स्वभाव झाला होता. पोलिसांनी त्याच्या वाहनांचा शोध घेतला असता, त्याच्या ताब्यात फक्त एक कार आणि दोन स्कुटी सापडल्या. या सर्व वाहनांवर “BOSS” अशीच नेमप्लेट होती. तपासात यापैकी एक नंबरप्लेट बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या ही वाहने कोथरूड पोलिस ठाण्यात ठेवण्यात आली असून उर्वरित वाहनांचा शोध सुरू आहे. दरम्यान, पासपोर्ट आणि शस्त्र परवान्याच्या प्रकरणात राजकीय नेत्यांचे नाव पुढे येत असल्याने हे प्रकरण आणखी गहिरे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

