(पुणे)
वाचनाची गोडी लावणारा आणि पुस्तकप्रेमींसाठी पर्वणी ठरणारा पुणे पुस्तक महोत्सव २०२५ येत्या १३ ते २१ डिसेंबर दरम्यान फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यास (National Book Trust) यांच्या वतीने हा महोत्सव भरवण्यात येणार असून, यावेळी राज्यभरातील वाचकांना दर्जेदार पुस्तकांच्या सहवासाचा आनंद मिळणार आहे.
दिल्लीनंतर पुण्याचा क्रमांक!
देशभरात राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या पुस्तक महोत्सवांना भरघोस प्रतिसाद मिळतो. दिल्लीतील यशस्वी आयोजनानंतर, दुसरा क्रमांक पुण्याचा लागतो, अशी माहिती राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक युवराज मलिक यांनी दिली. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे आणि प्रसेनजीत फडणवीस उपस्थित होते.
या वर्षीची थीम : ‘Joy of Reading’
मलिक यांनी सांगितले की, २०२५ च्या महोत्सवाची संकल्पना ‘Joy of Reading’ (वाचनाचा आनंद) ही असेल. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट पत्रकारिता (बेस्ट मीडिया कव्हरेज), दर्जेदार फोटोग्राफी यासाठी विशेष पुरस्कारही दिले जाणार आहेत. तसेच, ३ हजार पुस्तके मोफत डाउनलोड करता येतील अशी सुविधा महोत्सवात उपलब्ध करून दिली जाणार आहे. दर्जेदार, समतोल आणि विचारप्रवर्तक पुस्तकांचा संच यावेळी वाचकांसाठी उपलब्ध राहील.
पुण्यासाठी विशेष फिरती पुस्तक बस देखील चालवण्यात येणार आहे. या माध्यमातून पुण्याच्या उपनगरांतील आणि ग्रामीण भागातील वाचकांपर्यंत वाचनसंस्कृती पोहोचवली जाईल. महोत्सवात पायरेटेड व चोऱ्यांची पुस्तके विक्रीस ठेवली जाणार नाहीत, याची सक्तीने अंमलबजावणी केली जाणार आहे. यासाठी विशेष तपासणी समिती स्थापन करण्यात येईल. तसेच, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतील स्वतंत्र प्रदर्शन विभाग, आणि पुस्तक प्रदर्शनासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांनाही विशेष प्राधान्य दिले जाईल, असे युवराज मलिक यांनी सांगितले.
पुण्यासोबतच मुंबई, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथेही पुस्तक महोत्सव आयोजनाच्या योजना असून, लवकरच ही पर्वणी इतर ठिकाणीही अनुभवता येणार आहे.

