(पुणे)
कुख्यात गुंड बंडू आंदेकर याच्या घरावर पोलिसांनी टाकलेल्या झडतीत कोट्यवधी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत तब्बल ६७ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, चांदी, २ लाख ५० हजार रुपयांची रोकड, एक अलिशान मोटारकार, विविध करारनामे, कर भरल्याच्या पावत्या आणि जमीन व्यवहाराच्या काही इसार पावत्या पोलिसांना हस्तगत झाल्या आहेत.
नातवाच्या हत्येमागे आंदेकरचा कट
आयुष उर्फ गोविंद गणेश कोमकर (वय १९, रा. नाना पेठ) या महाविद्यालयीन तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा धक्कादायक तपशील समोर आला आहे. गृहकलहातून आंदेकरने स्वतःच्याच नातवाच्या खुनाचा कट रचल्याचे तपासात उघड झाले.
५ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला रात्री साडेसातच्या सुमारास नाना पेठेत हल्लेखोरांनी आयुषवर गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेल्या आयुष्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर आंदेकर कुटुंबासह देवदर्शनासाठी रवाना झाला होता, अशी माहितीही तपासातून पुढे आली आहे.
झडतीत कोट्यवधींचा ऐवज
१० सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता पोलिसांनी आंदेकरच्या घरावर सर्च ऑपरेशन सुरू केले. ही कारवाई तब्बल अकरा तास सुरू राहून ११ सप्टेंबरच्या पहाटे चार वाजेपर्यंत चालली. यावेळी पोलिसांना कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला. त्यानंतर आंदेकरच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
तपास गुन्हे शाखेकडे
या हत्येप्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक झाली असून, उर्वरित पाच आरोपींचा शोध गुन्हे शाखेच्या पथकांकडून घेतला जात आहे. आंदेकर टोळीला आर्थिक आणि इतर प्रकारे मदत करणाऱ्यांची माहिती गोळा करून त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

