(संगमेश्वर / एजाज पटेल)
सध्याच्या युगात पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे. मात्र आजही काही कुटुंबे अशी आहेत की, जी केवळ पारंपरिक व्यवसायावरच उदरनिर्वाह करतात. या व्यवसायासाठी त्यांना देशभरात सतत भटकंती करावी लागते. कधी या राज्यात, तर कधी त्या राज्यात तसेच सणांनुसार गावोगाव जाऊन आपला व्यवसाय करावा लागतो.
ढोलक बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय करणारे उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील काही लोक गणेशोत्सव तसेच श्रावणातील इतर सणांच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वरच्या बाजारपेठेत तसेच तालुक्यातील गाववाड्यांपर्यंत ढोलकी विक्रीसाठी पोहोचले आहेत.
ढोलक बनविणे हाच त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या काळात आरतीसाठी घरोघरी ढोलकीचा वापर होतो. त्यामुळे या दिवसात ढोलकीला विशेष मागणी असते, म्हणूनच ते या काळात महाराष्ट्रात व्यवसाय करतात.
दोनशे रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत किंमत
ढोलकीची किंमत दोनशे रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत असल्याचे व्यावसायिक अक्रम शेख यांनी सांगितले. ढोलकीचे पुठ्ठा व लाकडी पुठ्ठ्याचे असे दोन मुख्य प्रकार आहेत. मात्र महाराष्ट्रात लाकडी पुठ्ठ्याच्या ढोलकीलाच जास्त पसंती मिळते. यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच आपला चरितार्थ चालवतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सवानंतर लगेच नवरात्र सुरू होते. त्यामुळे या काळात हे विक्रेते महाराष्ट्राला प्राधान्य देतात. त्यानंतर ते गोवा तसेच इतर राज्यांकडे प्रयाण करतात. प्रत्येक राज्यातील सणांची त्यांना अचूक माहिती असते. कोणत्या राज्यात कोणता सण, कोणत्या काळात, आणि त्यावेळी ढोलकीला मागणी असेल, याचे गणित त्यांच्याकडे तयार असते.
भटकंतीमुळे या कुटुंबातील मुले शिक्षणापासून वंचित राहतात. स्थिर वास्तव्य नसल्याने त्यांना शाळेत जाण्याची संधीच मिळत नाही. लहान वयापासूनच ते ढोलकी बनविण्याचे प्रशिक्षण घेतात आणि कौशल्य मिळवतात; मात्र जगासोबत चालण्यासाठी आवश्यक असलेल्या शिक्षणापासून ते वंचित राहतात.
उदरनिर्वाहासाठी पारंपरिक व्यवसाय
महागाईच्या काळात सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे. भटकंती करून व्यवसाय करणाऱ्यांनाही या महागाईचा फटका बसतो. पण उदरनिर्वाहासाठी पर्याय नसल्याने आम्ही हा पारंपरिक व्यवसाय चालू ठेवतो, असे अक्रम शेख यांनी सांगितले.