(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर येथील बँक ऑफ इंडिया शाखेचे ग्राहक असलेल्या चेतना चंद्रकांत खांडेकर (वाशी) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने त्यांचे पती चंद्रकांत सजना खांडेकर यांना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत दोन लाख रुपयांचा विमा धनादेश प्रदान करण्यात आला.
बचत गटाच्या मार्गदर्शनातून विमा उतरवण्याचे फायदे समजावून देण्यात आले होते. त्या मार्गदर्शनाचा लाभ घेत चेतना खांडेकर यांनी विमा उतरवला होता. त्याचाच लाभ त्यांच्या वारस पतीला मिळाला.
संगमेश्वर तालुक्यातील वाशी गावातील रहिवासी चेतना खांडेकर यांच्या निधनाची माहिती त्यांचे पती चंद्रकांत खांडेकर यांनी बँकेचे शाखाधिकारी पठाण आणि बँकमित्र निलेश कदम यांना दिली. त्यानंतर बँकेने तपासणी केली असता मयत व्यक्ती पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना योजनेच्या विमाधारक असल्याचे आढळले.
बँक मित्र निलेश कदम यांनी तत्काळ आवश्यक मार्गदर्शन करून विमा रजिस्टर क्लेम दाखल केला आणि पाठपुरावा करून अवघ्या १५ दिवसांत दोन लाख रुपयांचा धनादेश वारस चंद्रकांत खांडेकर यांना सुपूर्द करण्यात आला.
या प्रसंगी बँकेचे शाखाधिकारी पठाण, वैभव गोडे, मनोज, बी. सी. निलेश कदम व बँक सखी सानिका कदम उपस्थित होते.
प्रत्येक ग्राहकाने बँकेच्या विमा योजनांचा लाभ घ्यावा : निलेश कदम
आपल्या पश्चात कुटुंबाला कठीण परिस्थितीत आर्थिक मदत व्हावी यासाठी बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांनी बँकेतील विविध प्रकारच्या विमा योजनांचा विमा करून घ्यावा, असे आवाहन बी. सी. निलेश कदम यांनी केले आहे.