(देवरुख / प्रतिनिधी)
श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुखच्या ग्रंथपाल श्रद्धा अशोक आमडेकर ( पूर्वाश्रमीच्या स्वाती विष्णू जोशी, पालशेत, गुहागर) यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरावरील ‘डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार: २०२३-२४’ जाहीर झाला आहे. या पुरस्कारांतर्गत रोख रक्कम ₹ ५०,०००/-, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथ भेट देऊन महाराष्ट्र शासनाकडून श्रद्धा आमडेकर यांना सन्मानित केले जाणार आहे.
ग्रंथपाल श्रद्धा आमडेकर मार्च, १९९८ पासून फेब्रुवारी,२०१७ पर्यंत सहाय्यक ग्रंथपाल म्हणून, तर १ मार्च,२०१७ ते आजपर्यंत ग्रंथपाल म्हणून वाचनालयात कार्यरत आहेत. त्या बी.कॉम., बी. लिब. असून, त्यांना सन २०१७ मध्ये रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ, रत्नागिरी यांच्याकडून उत्कृष्ट ग्रंथालय सेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. शासनमान्य ग्रंथालय वर्गाच्या एल. टी. सी. कोर्समधील विद्यार्थ्यांना सौ. आमडेकर यांचे मार्गदर्शन लाभते.
श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालयाला सन २०१२-१३चा महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार’ प्राप्त झाला होता. यापूर्वी सन २००३ मध्ये वाचनालयाच्या माजी ग्रंथपाल मेधा भालचंद्र जोशी यांना महाराष्ट्र शासनाकडून उत्कृष्ट ग्रंथालय सेवकास दिला जाणारा ग्रंथ मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. श्रद्धा आमडेकर यांना पुरस्कार जाहीर झाल्यावर वाचनालयात कार्यकारी मंडळ सदस्य, विशेष निमंत्रित सदस्य आणि सल्लागार मंडळ सदस्य यांच्या उपस्थितीत त्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या देवरुख शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. अरविंद कुलकर्णी यांनीही परिषदेच्यावतीने त्यांचा सन्मान केला.
वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. गजानन जोशी, प्रा. डॉ. वर्षा फाटक, प्रा. डॉ. अरविंद कुलकर्णी, प्रा. किरण देशपांडे यांनी ग्रंथपाल आमडेकर यांच्या यशस्वी कारकिर्दीचा आपल्या मनोगतातून आढावा घेतला. यानंतर आमडेकर यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करून, सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त केली आणि आभार मानले.
फोटो: आमडेकर दांपत्याच्या सत्काराप्रसंगी उपस्थित वाचनालयाचे पदाधिकारी आणि कर्मचारी.