( नवी दिल्ली )
देशभरात यंदाच्या वर्षी पावसाने थैमान घातल्यानंतर आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टी, पूर आणि पिकांच्या मोठ्या नुकसानीनंतर परिस्थिती काहीशी सुरळीत होतेय, असे वाटत असतानाच हवामान विभागाने पुन्हा हाय अलर्ट जारी केला आहे. ‘सेन्यार’ नावाचे नवे चक्रीवादळ ताशी १०० किमी वेगाने देशाच्या दिशेने सरकत असून पुढील काही दिवस हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, मलेशियाच्या आसपास तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळात परिवर्तित होत आहे. हे प्रणाली हळूहळू बंगालच्या उपसागराकडे सरकत असून पुढील २४ ते ४८ तासांत याचा प्रभाव वाढण्याचा अंदाज आहे. परिणामी, देशाच्या काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा दक्षिणेकडील राज्यांना बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. आयएमडीने २९ नोव्हेंबरपर्यंत अंदमान-निकोबार बेटांवर अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला असून तामिळनाडू, ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील ७२ तास दक्षिणेकडील राज्यांसाठी धोकादायक ठरू शकतात, असा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत ताशी ६५ ते १०० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्र, उत्तर भारतात थंडी वाढणार
चक्रीवादळाचा अप्रत्यक्ष परिणाम म्हणून उत्तरेकडील राज्यांत थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. दिल्लीसह उत्तर भारतात तापमानात लक्षणीय घसरण झाली आहे. महाराष्ट्रातही थंडी वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीचा इशारा देण्यात आला आहे. यंदा देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट घोंगावत असल्याने अनेक राज्यांमध्ये चिंता वाढली आहे.

