(संगमेश्वर / दिनेश अंब्रे)
संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथे राहणारे आणि नावडी येथील पोस्ट गल्ली रोडवर वाद्यसाहित्य दुकान चालवणारे चर्मवाद्यकर्मी दिलीप लिंगायत हे १५० वर्षांची परंपरा जपत आहेत. सन १८७६ पूर्वी, कै. श्री. गणलिंग लिंगायत कसबा यांनी या व्यवसायाची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांच्या वंशजांनी ही कला पुढे नेली. कै. श्री. भाऊ लिंग गणलिंग लिंगायत यांनी सन १९५५ पर्यंत देवीसाठी मृदुंग भरण्याचे काम केले.
त्यानंतर १९६० च्या दशकात, कै. श्री. सदाशिव भाऊलिंग लिंगायत यांनी नावडी येथील बाजारपेठेत दुकान सुरू केले. काही काळ त्यांचे दुकान गणपती मंदिराजवळील गणेश आळी येथेही होते. मुचरी, फुणगुस, खाडीपट्टा, नायरी आदी दूरवरच्या भागातून लोक ढोलकी, नाल, तबला, डगा भरण्यासाठी येथे येत असत. गेली अनेक दशके हा व्यवसाय त्यांनी जपला.
सध्या हा व्यवसाय श्री. दिलीप लिंगायत आणि त्यांचे भाऊ प्रकाश लिंगायत सांभाळत असून, त्यांना दिलीप लिंगायत यांचे मुलगे शिवम व अजिंक्य मदत करत आहेत. नावडी, पोस्ट आळी येथील प्रकाश सदाशिव लिंगायत यांच्या दुकानात आजही नाल, पखवाज, तबला, ढोलकी, डगा, मृदुंग, ढोलक, ताशा, डफली अशा विविध चर्मवाद्यांची दुरुस्ती व भरण्याचे काम केले जाते.
गोकुळाष्टमी, अखंड हरिनाम सप्ताह, गौरी-गणपती सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर (जुलै–सप्टेंबर) त्यांच्या दुकानात ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येते. एकूणच, १५० वर्षांची चर्मवाद्यकलेची परंपरा आजही दिलीप लिंगायत यांनी तितक्याच जोमाने जिवंत ठेवली आहे.